कोटय़वधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळय़ाचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगी याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी शाहिदा हिने विशेष न्यायालयात शनिवारी अर्ज दाखल केला. तेलगीच्या मालमत्ता खातरजमा करून सरकारजमा कराव्यात, तसेच या प्रकरणाचा फेरतपास करण्याची मागणीही शाहिदाने विशेष न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट मुद्रांक घोटाळय़ाचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगी याचा महिन्याभरापूर्वी बंगळुरूतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुद्रांक घोटाळय़ात उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेते, पोलीस अधिकारी यांना आरोपी करून अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील काही आरोपींनी अद्याप गुन्हा कबूल केला नाही. त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास करण्यात आला होता. तेलगीची पत्नी शाहिदा हिलादेखील आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाकडून तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

शाहिदा तेलगी (वय ५७, रा. खानापूर, बेळगाव, कर्नाटक) सध्या आजारी आहे. तेलगी बनावट मुद्रांक घोटाळय़ातून मोठय़ा प्रमाणावर पैसे कमवले होते. या पैशामधून विकत घेतलेल्या मालमत्ता सीबीआयकडून अद्याप सरकारजमा करण्यात आल्या नाहीत. स्थावर मिळकतीबाबत सीबीआयने फेरतपास करून खातरजमा करावी आणि या मालमत्ता सरकारजमा कराव्यात, अशी मागणी शाहिदाने विशेष न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे.

शाहिदाचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार आणि अ‍ॅड. प्रशांत जाधव यांनी विशेष न्यायाधीश ग्वालानी यांच्या न्यायालयात शनिवारी अर्ज दाखल केला. तेलगीने कर्नाटकातील बेळगाव जिल्हय़ातील खानापूर भागात मालमत्ता खरेदी केल्या आहेत. प्राप्तिकर विभागाकडे या नोंदी आहेत. तेलगीने प्राप्तिकर भरलेला आहे. कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने त्याने मालमत्ता खरेदी केल्या आहेत. अशा सर्व मालमत्ता सीबीआयने फेरतपास व खातरजमा करून सरकारजमा कराव्यात, असे शाहिदाने दाखल केलेल्या अर्जात नमूद केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telgis property will be provided to the government says telgis wife shahida to court
First published on: 16-12-2017 at 16:43 IST