Radhika Yadav Murder Case Update: हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवची गुरुग्राममील राहत्या घरी वडिलांनीच गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आता दोन दिवसांनी कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच आरोपी वडील दीपक यादव यांनी कथितपणे हत्येबद्दल पश्चातापही व्यक्त केला आहे. दीपक यादव यांचे मोठे बंधू विजय यादव (५४) यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला असून सदर घटनेचा निषेध केला. “आरोपी दीपक यादव यांना पश्चाताप होत असून त्यांनी फाशी मिळावी, असा FIR लिहिण्याची पोलिसांना विनंती केल्याचे”, ते म्हणाले.
दीपक यादव यांची एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्यांना दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली. “जे काही घडले ते अतिशय चुकीचे होते. मी जेव्हा माझ्या भावाला पोलीस ठाण्यात भेटलो तेव्हा त्याने पोलिसांना फाशी व्हावी, असा एफआयआर बनवा, अशी विनंती केली. माझ्या भावाने कन्या वध केला”, अशी प्रतिक्रिया विजय यादव यांनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणात कुटुंबियांचेही जबाब नोंदविले आहेत. तसेच राधिकाच्या हत्येबाबतचे अनेक कंगोरे सध्या चर्चेत आहेत. मात्र अद्याप अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. गुरूवारी (१० जुलै) सकाळी १०.३० वाजता गुरुग्राम येथील राहत्या घरात दीपक यादव यांनी मुलीवर गोळ्या झाडल्या. तेव्हा राधिका स्वयंपाक घरात काम करत होती.
दीपक यांचा लहान भाऊ कुलदीप (वय ४६) हा त्याच घरात तळमजल्यावर राहतो. गोळ्यांचा आवाज ऐकून तो वरच्या मजल्यावर धावत गेला. तेव्हा राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली.

प्रेमसंबंधामुळे हत्या झाली नसल्याचा दावा
दरम्यान, प्रेमसंबंधांना आक्षेप असल्यामुळे गुन्हा घडल्याच्या अफवांना कुटुंबियांनी शनिवारी खोडून काढले. विजय यादव म्हणाले, “आंतरजातीय लग्नाला विरोध करू इतके अशिक्षित आमचे कुटुंब नाही. जर असे काही असते तर आम्ही गावातच तो प्रश्न सोडवला असता.”
दीपक यादव यांचे दुसरे बंधू राजेश (वय ५२) म्हणाले की, राधिकाचे करिअर होण्यासाठी त्याने सर्व काही केले. पण अचानक त्याने असे का केले, हेच कोडे आम्हाला पडले आहे. क्षणिक रागातून ही घटना घडली असावी, अशीही शक्यता त्यांनी वर्तविली.
कुलदीप यादव म्हणाले, एखाद्याच्या नशीबात लिहिलेली गोष्ट बदलता येत नाही. तर विजय यादव म्हणाले, “तो (दीपक यादव) रडत होता, त्याला आतून दुःख झाले होते. पश्चाताप त्याला बोचत होता. त्यामुळेच तो तिला समोरून गोळ्या झाडू शकला नाही. त्याने मागून गोळ्या मारल्या.”