Radhika Yadav Murder Case : हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवची तिच्या वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना गुरुग्राममध्ये नुकतीच घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राधिकाचे वडील दीपक यादवला पोलिसांनी अटक केलं असून पुढील तपास सुरू आहे. राधिका यादव हत्या प्रकरणात आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे. राधिका यादवचा सोशल मीडियावरील वावर तिच्या वडिलांना फारसा रुचत नसल्याचंही सांगितलं जात आहे.

तसेच राधिकाच्या हत्या प्रकरणानंतर वडिलांनी स्वतःच आपला गुन्हा कबूल केला आहे. मात्र, यातच राधिका यादवचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ १ वर्ष जुना असून राधिकाने अभिनेता इनाम-उल-हक बरोबर शूट केला होता. हा व्हिडीओ एक म्युझिक व्हिडीओ आहे. त्या म्युझिक व्हिडीओमध्ये एक प्रेमकथा दाखवण्यात आली होती. राधिकाच्या हत्येनंतर या व्हिडीओच्या अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, राधिकाबरोबरच्या व्हायरल म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणारा सहकलाकार अभिनेता इनाम-उल-हकने आता राधिका यादवच्या हत्या प्रकरणावर मौन सोडत प्रतिक्रिया शुक्रवारी देत संबंधित व्हिडीओबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे. इनाम-उल-हकने स्पष्ट केलं की त्यांच्या व्यावसायिक संवादाव्यतिरिक्त त्याचा राधिकाशी कोणताही संबंध नव्हता. तसेच आपण तिला पहिल्यांदा दुबईतील टेनिस प्रीमियर लीगमध्ये भेटलो आणि नंतर तिच्याबरोबर एक म्युझिक व्हिडीओ शूट केला, जो आता यूट्यूबवर उपलब्ध असल्यामुळे व्हायरल होत असल्याचं त्याने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

अभिनेता इनाम-उल-हकने काय म्हटलं?

राधिकाबरोबरच्या व्हायरल व्हिडीओबाबत एएनआयशी बोलताना अभिनेता इनाम-उल-हकने म्हटलं की, “मी तिला (राधिका) पहिल्यांदाच दुबईमध्ये झालेल्या एका टेनिस प्रीमियर लीगमध्ये भेटलो होतो. त्यानंतर मी तिला एका म्युझिक व्हिडीओमध्ये भेटलो. ती माझ्यासाठी एक अभिनेत्री होती. मी अनेक अभिनेत्रींबरोबर काम केलेलं आहे. राधिका फक्त म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगसाठी आली होती आणि नंतर ती पुन्हा वापस गेली. आम्ही तिला थोडे पैसे दिले होते, पण व्हिडीओच्या निर्मितीचे पैसे दिले गेले नाहीत. तसेच त्यानंतर मी कधीही तिला संपर्क साधला नाही”, असं अभिनेता इनाम-उल-हकने म्हटलं आहे.

इनाम-उल-हकने व्यक्त केली ‘ही’ खंत

“या घटनेला हिंदू-मुस्लिम दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे, अशी खंतही अभिनेता इनाम-उल-हकने व्यक्त केली. “मला माहित नाही की हे का केलं जात आहे? माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राधिकाकडे सोशल मीडिया नाही. युट्यूबवर फक्त एक व्हिडीओ क्लिप आहे, म्हणूनच ती वारंवार हायलाइट केली जात आहे, असं इनाम-उल-हकने म्हटलं आहे.

कोण होती राधिका यादव?

२३ मार्च २००० साली जन्मलेली राधिका ही प्रतिभावान टेनिसपटू होती आणि तिची इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन (ITF) मध्ये दुहेरी टेनिस खेळाडू म्हणून ११३ वी रँक होती. आयटीएफ डबल्समध्ये देखील टॉप दोनशे खेळाडूंमध्ये तिचा क्रमांक होता. महिला दुहेरी प्रकारात ती हरियाणात पाचव्या स्थानावर होती असे सांगितले जाते. राधिका यादव ही तिच्या बरोबरीच्या खेळाडूंपैकी ‘टॉप प्लेयर’ म्हणून म्हणून उदयास येत होती, असं बिझनेस स्टँडर्डने एका वृत्तात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधिका यादव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामसाठी रील्स बनवत असे, पण दुर्दैवाने हेच राधिकाच्या हत्येचे कारण बनल्याची शक्यता आहे. राधिकाचे माजी प्रशिक्षक मनोज भारद्वाज यांनी या प्रकाराबद्दल राधिकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि हे मोठे नुकासान असल्याचे म्हटले आहे. राधिका ही अत्यंत हुशार आणि होतकरू खेळाडू होती. तिने स्कॉटीश हाय इंटरनॅशनल स्कूलमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्याच्या आधी २०१८ मध्ये तिने कॉमर्समधून १२वी उत्तीर्ण केली होती आणि शाळेच्या दिवसांपासूनच तिने टेनिस खेळण्यास सुरूवात केली होती.