चंडीगड :पतियाळामध्ये शुक्रवारी हरीश सिन्ग्ला यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (बाळ ठाकरे) या संघटनेने खलिस्तानधार्जिण्या गटांच्या विरोधात कालिमाता मंदिर परिसरात मोर्चा काढला. या संघटनेचे कार्यकर्ते आणि शीख तसेच निहंग यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. शहरातील स्थिती तणावपूर्ण असून शनिवापर्यंत संचारबंदी लागू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पतियाळा दूरक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक राकेश अगरवाल यांनी सांगितले की, सध्या येथील स्थिती नियंत्रणात आहे. मोर्चातील काही कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची अफवा पसरल्यानंतर येथे तणाव पसरला, असे त्यांनी स्पष्ट केले.  शिवसेनेने मोर्चाची हाक दिल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी येथील दु:खनिवारण गुरुद्वारेत निहंग जमले होते. ते खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत कालिमाता मंदिराकडे जाऊ लागले. त्यांना पोलिसांनी रोखले. या वेळी एक पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी शहरात ध्वजसंचलन केले तसेच अन्य जिल्ह्यांतून पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे.  

सूत्रांनी सांगितले की, शीख आणि मंदिरातील हिंदू कार्यकर्ते यांच्यात दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. कोणी आत घुसू नये म्हणून मंदिराचे दरवाजे कुलूपबंद करण्यात आले होते. पोलिसांनी हवेत गोळीबार केला, तेव्हा त्यांना अडविण्याचा प्रयत्न करताना काही निहंग दिसत होते. पतियाळाचे पोलीस अधीक्षक नानकसिंग त्या वेळी तेथे होते. गोळीबाराच्या अनेक फैरी झाडूनही शीख आणि निहंग ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. तेथे उपस्थित असलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच हा गोळीबार करण्यात आला, असे पोलीस महानिरीक्षकांनी स्पष्ट केले.  

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खलिस्तानविरोधात घोषणा दिल्या होत्या. दोन्ही गट एकमेकांच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांपासून एक किलोमीटर अंतरावर आर्य समाज येथे पोलिसांची वेगळी तुकडी तैनात ठेवली होती. पतियाळाच्या पोलीस उपायुक्तांनी शनिवारी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींची शांतता बैठक आयोजित केली आहे.

मोर्चाशी संबंध नाही- शिवसेना, नेत्याची पक्षातून हकालपट्टी

पतियाळात खलिस्तानविरोधी मोर्चा आयोजित केलेले हरिष सिन्ग्ला यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेनेच्या पंजाब राज्य प्रमुख योगिराज शर्मा यांनी जाहीर केले आहे. बंदी घातलेली संघटना ‘सीखस फॉर जस्टिस’चा गुरपतवंतसिंग पनून याने १५ दिवसांपूर्वी हरियाणात जिल्हा पोलीस कार्यालयांच्या ठिकाणी खलिस्तान स्थापना दिन पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून सिन्ग्ला यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. सिन्ग्ला यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रीय सचिव अनिल देसाई यांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिन्ग्ला यांनी काढलेल्या मोर्चाशीही पक्षाचा संबंध नाही, असा दावा शर्मा यांनी केला. तसे पत्र पोलिसांना २० तारखेलाच देण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले आहे. तर आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यास पक्षातून काढण्याचा अधिकार शर्मा यांना नाही, असा दावा सिन्ग्ला यांनी केला आहे.

शांततेला प्राधान्य -मुख्यमंत्री मान

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याबाबत आपण पोलीस महानिरीक्षकांशी चर्चा केली आहे. त्या भागात शांतता प्रस्थापित झाली आहे. आमचे तेथील स्थितीवर लक्ष आहे. राज्यात अशांतता निर्माण करण्याचा कोणाचाही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. राज्यातील शांतता आणि सौहार्द कायम राखण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.