दहशतवादाशी संबंधित मोहिमांच्या प्रसारमाध्यमांकरवी होणाऱ्या वार्ताकनाचे निकष निश्चित करण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू असल्याचे माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यम संस्थांवर बंदी घालण्याचे दिवस संपले असून, तंत्रज्ञानामुळे सेन्सॉरशिप आणणे अशक्य झाले असल्याचे जेटली यांनी न्या. जे. एस. वर्मा स्मृती व्याख्यानमालेत बोलताना सांगितले. सुरक्षा संस्थांच्या दहशतवादविरोधी मोहिमांचे वृत्तांकन ज्या रीतीने करण्यात आले, तो सध्याच्या काळात प्रसारमाध्यमांच्या जबाबदारीसंबंधीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असे ते म्हणाले.
अशा मोहिमांच्या ठिकाणी वार्ताहरांना थेट जाऊ द्यावे की त्यावर काही र्निबध असावे, हा प्रश्न आहे. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्यामुळे दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना सुरक्षा संस्था काय करत आहेत याची आयतीच माहिती मिळाल्याचा दावा गुप्तचर संस्थांनी केला होता, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले. अशी परवानगी दिली जाऊ नये, असे देशाच्या सुरक्षा संस्था आणि संरक्षण मंत्रालय यांचे स्पष्ट मत असल्याचे त्यांनी नमूद केले.