११ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे भारतीय लष्कराच्या छावणीवर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात चार जवानांना प्राण गमवावे लागले होते. तर या दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. दरम्यान, पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत एक व्हिडीओ जारी केला आहे.
पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये एक दहशदवादी इंग्रजीत बोलतो आहे. त्याचा चेहराही ब्लर करण्यात आला आहे. ”पीएएफएफने ईदच्या दिवशी दिलेल्या संदेशात वचन दिल्याप्रमाणे आम्ही राजौरीमध्ये हल्ला केला आहे.”, असे या व्हिडीओत सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – भारताचे दरवाजे आमच्यासाठी उघडा; अफगाणिस्तानातल्या विद्यार्थ्यांची साद
शनिवारी संध्याकाळी जारी केलेल्या व्हिडीओत भारतात वर्षाच्या शेवटी होणाऱ्या जी-२० देशांच्या शिखर परिषदेचे आयोजन करू देणार नाही, अशी धमकीही देण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ आयएसआयकडून चालवण्यात येणाऱ्या प्रपोगंड्याचा भाग आहे. नवीन दहशतवादी संघटनांचे नाव वापरून जम्मू-काश्मीर अस्थीर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.