लाहोर : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला खडसावले. लाहोरमध्ये नुकत्याच झालेल्या ‘फैज उत्सवा’त एका प्रश्नाचे उत्तर देताना अख्तर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतामध्ये ज्याप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांचे आपुलकीने स्वागत झाले, तसे पाकिस्तानात झाले नाही याची जाणीवही त्यांनी उपस्थितांना करून दिली. 

भारतीय उपखंडात लोकप्रिय असलेले पाकिस्तानी शायर फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लाहोरमध्ये दरवर्षी फैज उत्सव साजरा केला जातो. यंदा जावेद अख्तर उत्सवात सहभागी झाले होते. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात एका उपस्थिताने ‘पाकिस्तान हा सकारात्मक, मैत्रीपूर्ण भावना बाळगणारा आणि प्रेमळ लोकांचा देश आहे असा संदेश भारतीयांना द्या,’ असे आवाहन अख्तर यांना केले. त्याला उत्तर देताना अख्तर यांनी परखडपणे आपली मते मांडली. आपण एकमेकांना दोष देऊ नये, त्याने प्रश्न सुटणार नाही. वातावरण तणावाचे आहे आणि ते निवळले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

नुसरत फतेह अली खान आणि मेहदी हसन यांच्यासारख्या कलाकारांचे भारतात आपुलकीने स्वागत झाले, त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. पण पाकिस्तानात लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम कधी आयोजित करण्यात आला नाही, ही बाब अख्तर यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिली.

विशेष म्हणजे या वाक्याला उपस्थितांनी टाळय़ांच्या कडकडाटात दाद दिली. जावेद अख्तर यांच्या भाषणाचा हा भाग समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात पसरला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कंगनाचे ‘घूमजाव’

शबाना आझमी आणि जावेद अख्तर देशद्रोही आहेत, असा आरोप काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री कंगना रनौत हिने केला होता. अख्तर यांच्या या विधानानंतर मात्र, ‘घर में घुस के मारा’ असे ट्वीट करून तिने प्रशंसा केली.

आम्ही मुंबईचे आहोत, आम्ही आमच्या शहरावर झालेला हल्ला पाहिला आहे. हल्लेखोर नॉर्वे किंवा इजिप्तमधून आले नव्हते, ते तुमच्या देशातून आले होते. त्यामुळे त्याबद्दल भारतीयांची तक्रार असेल तर पाकिस्तानी लोकांनी अपमान वाटून घेता कामा नये.

– जावेद अख्तर, ज्येष्ठ कवी-गीतकार