Pahalgam Terror Attack Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित संशयित दहशतवादी विमानात असल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या पोलिसांनी शनिवारी चेन्नईहून कोलंबोला येणाऱ्या विमानाची बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर झडती घेतल्याची माहिती श्रीलंकन पोलिसांनी दिली आहे.

श्रीलंकेची राष्ट्रीय विमान कंपनी श्रीलंका एअरलाइन्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे विमान सकाळी ११:५९ वाजता चेन्नईहून कोलंबोच्या बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. त्यानंतर विमानाची कसून सुरक्षा तपासणी करण्यात आली. “चेन्नई एरिया कंट्रोल सेंटरकडून भारतात हवे असलेले संशयित दहशतवादी विमानात असल्याचे समजल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही झडती घेण्यात आली”, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, विमानाची कसून तपासणी करण्यात आल्यानंतर त्याच्या पुढील ऑपरेशनसाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली, ज्यात बहुतेक पर्यटक होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामागील पाच दहशतवाद्यांची भारतीय अधिकाऱ्यांनी ओळख पटवली असून, यामध्ये तीन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे.

पंतप्रधानांचा इशारा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, दहशतवाद आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध “कठोर आणि निर्णायक कारवाई” करण्यास भारत वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्काल्व्हेस लॉरेन्को यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आज म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना त्यांनी हे विधान केले आहे.

पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले

पहलगाम हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून, भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. अटारी सीमा बंद केली असून, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले आहेत. याचबरोबर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल आणि एक्स हँडल्सवर भारतात बंदी घालण्याची कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे पाकिस्ताननेही भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांची हवाई हद्द बंद केली आहे. याचबरोबर पाकिस्तानी राजकीय नेते भारताविरोधात चिथावनीखोर विधाने करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानी जहाजांना बंदी

दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता भारताने शनिवारी पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार, पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्देशानुसार भारताच्या ध्वजधारी जहाजांनाही पाकिस्तानातील बंदरांवर डॉकिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.