Himanshi Narwal Statement on Operation Sindoor: भारतीय हवाई दलाने मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा यानिमित्ताने सूड घेण्यात आला. पहलगाम हल्ल्यात नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांची हत्या करण्यात आली होती. आता ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांनी मोठी प्रतिक्रिया दिली असून लष्कराचे आभार व्यक्त केले आहेत.

हिमांशी नरवाल म्हणाल्या, आपले सैन्य आणि मोदी सरकारने दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना कडक इशारा दिला आहे. पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या २६ जणांच्या कुटुंबियांनी जे दुःख, वेदना भोगल्या त्या वेदना आता पाकिस्तानमधील जनतेलाही कळतील.

२२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याची आठवण सांगताना हिमांशी नरवाल म्हणाल्या, मी हात जोडून अतिरेक्यांना विनंती केली होती. पण त्यांची माझी विनंती मान्य केली नाही. माझे फक्त सहा दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. माझ्या पतीला सोडून द्या. पण त्यांनी दया दाखवली नाही. उलट एका अतिरेक्याने म्हटले की, हे मोदींना जाऊन सांग आणि आज मोदीजी आणि भारतीय सैन्याने अतिरेक्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबविल्याबद्दल मी सरकारचे धन्यवाद व्यक्त करते. पण मी सरकारला विनंती करते की, हे इथेच थांबवू नका. दहशतवादाला नेस्तनाबूत करण्याची ही सुरुवात आहे. माझ्याबरोबर जो प्रसंग घडला, तो कुणाबरोबरही घडायला नको.

तसेच या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर नाव दिल्याबद्दलही हिमांशी नरवाल यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, मी या नावाशी जोडले गेले आहे. मी माझा जोडीदार गमावला. कुणालाच कल्पना नाही की, आता माझ्या मनावार किती मोठा आघात झालेला आहे. त्यामुळे या मोहिमेला चांगले नाव दिले गेले. पहलगामच्या हल्ल्यात अनेकांनी आपली मुले, काहींनी आपले पती, वडील गमावले. मी आशा करते की, अशी घटना पुन्हा कुणाबरोबर घडू नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रोलिंगवरही केले भाष्य

काही दिवसांपूर्वी हिंदू-मुस्लीम द्वेष पसरता कामा नये, असे कथित विधान केल्यामुळे हिमांशी नरवाल यांना सोशल मीडियावर वाईट पद्धतीने ट्रोल केले गेले होते. या ट्रोलिंगवरही प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या की, माझ्या शब्दांना चुकीच्या पद्धतीने दाखविले गेल्यानंतर माझ्याविरोधात अनेकांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्यामुळे मला खूप दुःख झाले. मी एका शूर सैनिकाची पत्नी आहे. माझ्या पतीची हत्या झाल्यानंतर पहलगामच्या कुरणावर मी दोन तास एकटीच होती. माझ्याबरोबर इतर मृतांच्या पत्नी, बहीण, माताही होत्या. त्यामुळे मला आशा आहे की, सरकार आणि लष्कर आमचे हे दुःख समजून घेईल.