Elon Musk : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना त्यांच्या टेस्ला कंपनीतील काही प्रमुख गुंतवणूकदारांनी औपचारिकपणे एक विनंती केली आहे. इलॉन मस्क यांनी आठवड्यातील किमान ४० तास काम करावं, अशी मागणी टेस्लाच्या गुंतवणूकदारांनी केली आहे. या मागणीच्या पाठिमागचं कारण देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून टेस्लाच्या अलिकडच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं सांगितलं जातं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये इलॉन मस्क हे काही प्रमाणात सहभागी असल्यामुळे त्यांचं टेस्लाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा याआधी देखील झाली होती. एवढंच नाही तर त्यावरूनच काही दिवसांपूर्वी टेस्लातील गुंतवणूकदार निराश असल्याचंही बोललं जात होतं. तसेच इलॉन मस्क यांनी टेस्ला किंवा ट्रम्प यांच्यापैकी एकाची निवड केली पाहिजे, असा सल्ला देखील वॉल स्ट्रीटवरच्या प्रसिद्ध तज्ज्ञांनी मस्क यांना काही दिवसांपूर्वी दिल्याचं वृत्त समोर आलं होतं.

त्यानंतर आता इलॉन मस्क यांना त्यांच्या टेस्लातील गुंतवणूकदारांनी आठवड्यातील किमान ४० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. या गुंतवणूकदारांना असा विश्वास आहे की, इलॉन मस्क यांचं लक्ष सध्याच्या काळात स्पेसएक्स आणि एक्सएआयसह अनेक वेगवेगळ्या विभागात विभागलं गेलं आहे. त्यामुळे इलॉन मस्क यांचं टेस्लाकडे होणारं लक्ष कमी झालं आहे आणि त्याचाच परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होत आहे. या पार्श्वभूमीवरून टेस्लाच्या संचालक मंडळाला एक पत्र लिहून टेस्लाच्या उत्पन्नात आणि विक्रीत लक्षणीय वाढ पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी आणि शेअरहोल्डर्सचा विश्वास अजून जास्त बळकट करण्यासाठी इलॉन मस्क यांच्या टेस्लातील सहभागासंदर्भात कडक अटी घालण्याची विनंती गुंतवणूकदारांनी केली आहे.

टेस्लाच्या अलिकडच्या काळातील विक्रीत घट आणि जागतिक स्तरावरील कमी होत चाललेल्या प्रतिष्ठेबद्दल देखील चिंता व्यक्त करत गुंतवणूकदारांनी हे आवाहन केलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. दरम्यान, इलॉन मस्क यांचा राजकीय पक्षांबरोबर वाढता सहभाग पाहता गुंतवणूकदार चिंतेत असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार, टेस्लाची प्रतिष्ठा खराब होत आहे. आता अमेरिकन कंपन्यांच्या एका सर्वेक्षणात ९५ व्या क्रमांकावर असलेल्या टेस्लाच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये झालेली घसरण ही इलॉन मस्क यांच्या वाढत्या राजकीय सहभागाचा धोका असल्याचंही कारण त्यांनी सांगितलं आहे.

टेस्ला गुंतवणूकदार इलॉन मस्क यांच्यावर का चिंता व्यक्त करतायेत?

दरम्यान, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टेस्लाच्या विक्रीत लक्षणीय घट होत चालली आहे. यामध्ये विशेषतः युरोपियन बाजारपेठेत ही घट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १२ टक्के घट झाली आहे. गुंतवणूकदारांचा असा आरोप आहे की टेस्लाच्या बाबतीत हा नकारात्मक ट्रेंड मस्क यांच्या राजकीय सहभागाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत मस्क पुरेसा वेळ टेस्लावर देत नाहीत तोपर्यंत कंपनीची स्पर्धात्मक धार वाढणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुंतवणूकदारांनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?

दरम्यान, टेस्लाच्या बोर्डाचे अध्यक्ष रॉबिन डेनहोम यांना लिहिलेल्या पत्रात गुंतवणूकदारांनी म्हटलं आहे की, मस्क यांच्यासाठी भविष्यात टेस्लाशी पूर्णवेळ वचनबद्धतेची आवश्यकता आहे. पण आता मस्क यांनी दुसऱ्या व्यवसायांवर किती वेळ घालवायचा? यावर मर्यादा घालणारे स्पष्ट नियम बोर्डाने आणले पाहिजेत, असं गुंतवणूकदारांनी म्हटलं आहे.