Thalapathy Vijay Karur Rally Stampede: गेल्या महिन्यात तमिळनाडूत अभिनेता विजयच्या करूर येथिल प्रचारसभेत झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ४१ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विजयने मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांची आर्थिक दिली होती. आता, मृतांपैकी एका व्यक्तीच्या पत्नीने विजयने दिलेली ही आर्थिक मदत परत केली आहे.
शंकवी पेरुमल नावाच्या या पीडित महिलेने दावा केला आहे की, विजय तिच्या सांत्वनासाठी करूरमध्ये न आल्याने ती नाराज आहे. घरी येण्याऐवजी विजयने सांत्वनासाठी कुटुंबियांना ममल्लापुरममधील एका खाजगी रिसॉर्टमध्ये आमंत्रित केले.
विजयच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मृत रमेश यांची बहीण व तिच्या सासरच्या मंडळींना विजयला भेटण्यासाठी ममल्लापुरमला नेले. याच गोष्टीमुळे रमेश यांची पत्नी व वडील नाराज झाले आहेत. रमेश यांच्या बहिणीचा विजयशी भेटण्याचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मृत रमेश यांच्या पत्नी शंकवी पेरुमल म्हणाल्या, “विजयच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या नावाचा गैरवापर केला आहे. माझ्या पतीच्या बहिणीला ते विजयला भेटण्यासाठी घेऊन गेले. माझा पती विजयला पाहण्यासाठी त्या सभेत गेला होता, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर विजय मला बोलावून माझे सांत्वन करेल, अशी मला अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. मी मदत म्हणून मिळालेले २० लाख विजयला परत केले आहेत.”
अभिनेता विजयने चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची चेन्नई येथे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली आहे. ४१ मृतांपैकी ३७ जणांच्या कुटुंबियांनी विजयची भेट घेतली. तर इतर मृतांच्या कुटुंबियांना काही कारणास्तव विजयच्या भेटीसाठी चेन्नईला जाता आले नाही.
दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. सेंथिलकुमार यांनी चेंगराचेंगरीप्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशीचे आदेश दिले होते. त्या आदेशाला तमिझगा वेत्री कळगम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
काय आहे प्रकरण?
अभिनय क्षेत्र गाजवून राजकारणात प्रवेश केलेला तमिळ अभिनेता थलपती विजय याच्या २८ सप्टेंबर रोजी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला होता. विजयने गेल्या वर्षी तमिझगा वेत्री कळगम नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. तमिळनाडूत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून ही सभा आयोजित केली होती. या सभेसाठी हजारो लोक उपस्थित होते. याच दरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती.
