अभिनय क्षेत्र गाजवून राजकारणात प्रवेश केलेला तमिळ अभिनेता थलपती विजय याच्या शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजयने तमिझगा वेत्री कळगम नावाच्या पक्षाची स्थापना केली. तामिळनाडूत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून शनिवारी त्याने एक सभा आयोजित केली होती. या सभेसाठी हजारो लोक उपस्थित होते. याच दरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली. आता या घटनेबाबत विजयची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

काय म्हटलं आहे थलपती विजयने?

“जी घटना घडली त्या घटनेमुळे मला अतीव वेदना झाल्या आहेत. माझ्या मनाला वेदना होत आहेत. मी माझ्या वेदना आणि शोक शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. करुरमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्या भावांना आणि बहिणींना मी आदरांजली वाहतो. मी त्यांच्या कुटुंबांबाबत सहानुभूती व्यक्त करतो.” असं म्हणत थलपती विजयने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या एक्स पोस्टवर पोस्ट लिहून थलपती विजयने ही प्रतिक्रिया दिली आहे. विजयने जखमींना लवकर बरं वाटावं आणि आराम पडावा म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करत असल्याचंही म्हटलं आहे. लवकरात लवकर सगळ्या जखमींना बरं वाटेल अशी आशा आहे असंही त्याने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चेंगराचेंगरीच्या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “तामिळनाडूतील करूर येथे एका राजकीय रॅलीदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात त्यांना ताकद मिळो अशी प्रार्थना. जखमी पीडित लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.”

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तामिळनाडू सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय तपास आयोग नेमला आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश जस्टिस अरुणा जगदीसन या आयोगाच्या अध्यक्ष असतील. या आयोगाच्या चौकशीतून काय समोर येणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.