पीटीआय, प्रयागराज
वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिण बाजूच्या तळघरामध्ये हिंदूंना पूजा करण्याची परवानगी यापुढेही कायम राहील असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारीला दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या तळघरात पूजेला परवानगी देण्यात आली आहे. त्याविरोधात मशीद व्यवस्थापन समितीने दोन अर्ज दाखल केले होते. ते उच्च न्यायालयाने फेटाळले.न्या. रोहित रंजन अगरवाल यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. वाराणसी जिल्हा न्यायालयाने १७ जानेवारीला दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या ‘व्यास तहखाना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण तळघरासाठी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारीला तिथे पूजा करण्यास परवानगी दिली होती. काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या या ‘व्यास तहखान्या’त पूजा सुरू राहील असे उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले.
संपूर्ण नोंदी तपासल्यानंतर आणि संबंधित पक्षकारांचे युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर, जिल्हा न्यायालयाने १७ जानेवारी आणि ३१ जानेवारीला दिलेल्या आदेशांमध्ये हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण या न्यायालयाला दिसत नाही.’’न्यायालयाच्या या निकालाचा वकील अभ्यास करत असल्याचे ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद’चे संयुक्त सचिव मोहम्मद यासिन यांनी सांगितले. या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी समितीने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र त्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर समितीने २ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हेही वाचा >>>‘काँग्रेस काळात रखडलेल्या प्रकल्पांना आम्ही पूर्ण केलं’, पंतप्रधान मोदींची टीका; कृष्णा-कोयनाचा केला उल्लेख
आदेश काय?
वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारीला दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या तळघरात पूजेला परवानगी देण्यात आली आहे. त्याविरोधात मशीद व्यवस्थापन समितीने दोन अर्ज दाखल केले होते. ते उच्च न्यायालयाने फेटाळले.