Supreme Court : देशभरात सध्या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली-एनसीआर भागातील सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडण्याचे आणि निवारा केंद्रांमध्ये ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

आता भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांसंदर्भातील खटला स्वतःहून नव्याने स्थापन केलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आता गुरुवारी भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची मोठ्या खंडपीठात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातील सुनावणी आधी वेगळ्या खंडपीठाकडे सुरू होती. मात्र, हा खटला आता न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एनव्ही अंजारिया यांच्या विशेष खंडपीठाकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्ये ठेवण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचं आश्वासन सरन्यायाधीश बीआर गवई यांनी बुधवारी दिले होते.

दरम्यान, तीन न्यायाधीशांचं विशेष खंडपीठ आता भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी करणार आहे. यामध्ये भटक्या कुत्र्यांना पकडण्याविरुद्धच्या नवीन याचिकांचा समावेश आहे. या उद्या खंडपीठासमोर एकूण चार प्रकरणे सूचीबद्ध आहेत. त्यामुळे तीन न्यायाधीशांचं विशेष खंडपीठ या प्रकरणाबाबत काय निर्णय देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिले?

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांबद्दल मोठा निर्णय दिला. या भागातील सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी उभारलेल्या निवारा केंद्रांमध्ये ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण आदेशात नगरपालिका आणि इतर यंत्रणांना निर्धारित वेळेत पुरेशी निवाऱ्याची व्यवस्था उभारण्यासाठी समन्वयाने काम करावे आणि सार्वजनिक ठिकाणांहून भटकी कुत्री हटवली जातील याची खात्री करा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी

दिल्लीच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश बी. आर गवई यांनी लक्ष घालण्याची हमी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी सर्व भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या आदेशावर आक्षेप घेत एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर गवई यांच्या समोर ही बाब मांडली. त्यांनी ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर आक्षेप घेतला, ज्यात सर्व भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. यावर सरन्यायाधीश गवई म्हणाले, “पण, या प्रकरणी दुसऱ्या खंडपीठाने आधीच आदेश दिले आहेत. मी यामध्ये लक्ष घालेन.”