मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत कुठलाही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. तर दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून पलायन केलं आहे. एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पेटलेला असताना छत्तीसगढमध्ये प्रचाराला गेले आहेत. छत्तीसगढचा प्रचार महत्त्वाचा की महाराष्ट्रातली परिस्थिती महत्त्वाची? दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू झाला आहे. कुठला मच्छर चावला बघावं लागेल असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.

फडणवीसांनी राजीनामा द्यावा

देवेंद्र फडणवीस हे स्वतःला खूप जबाबदार, कर्तबगार समजतात. राज्याची त्यांना खडा न् खडा माहित आहे. त्यांच्याकडे गृहमंत्रीपदही आहे. राज्य मराठा आरक्षणावरुन पेटलं आहे. लोकप्रतिनिधींची घरं पेटवली जात आहेत. तरीही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री प्रचाराला गेले आहेत. मंत्र्यांना गावबंदी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आंदोलन चिघळत चाललं आहे. आज ते बोलताना पडले असंही मला दिल्लीत समजलं. अशात गृहमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन भाषणं करत आहेत? त्यांचा तातडीने राजीनामा घेतला गेला पाहिजे अशीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे. सगळ्या आंदोलकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे.

कुठे आहे कायद्याचं राज्य?

गावबंदी वगैरे जे काही प्रकार आहेत ते सुरु राहतीलच. मात्र गृहमंत्री ज्या बेदरकारपणे वागत आहेत त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असंही संजय राऊत म्हटलं आहे. मंत्र्यांना गावात येऊ दिलं जात नाही. आमदारांची घरं पेटवली जात आहेत. रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली जाते आहे कुठे आहे कायद्याचं राज्य? कायद्याचं राज्य हे फक्त विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी आणि त्यांच्यावर खोटे खटले दाखल करण्यासाठी आहे का? हे काही सरकार आहे का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रात कुठलं सरकारच अस्तित्वात नाही

महाराष्ट्रात सरकारच अस्तित्त्वात नाही. सरकार बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून तेवढा आवाकाच नाही. तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला आहे. अशा त्रिकोणात हे राज्य सापडलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने बरखास्त केलं पाहिजे

सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांनाच अपात्र ठरवलं पाहिजे. कारण विधानसभा अध्यक्षांच्या पदावर राहण्यासच ते अपात्र आहेत. राहुल नार्वेकर हे ज्या पद्धतीने चालढकल करत आहेत, ज्या पद्धतीने वेळकाढू करत आहेत. संविधान आणि घटना ते मानायला तयार नाहीत अशी व्यक्ती कुठल्याही पदावर राहता कामा नये असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आधी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना बरखास्त केलं पाहिजे आणि मग आमदारांना बरखास्त केलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.