कोपनहेगन विद्यापीठातील वैज्ञानिकांचे संशोधन
पृथ्वीवर ऑक्सिजन अल्प प्रमाणात तयार होण्याची क्रिया आपल्याला वाटत होती त्यापेक्षाही आधीची असून ३.८ अब्ज वर्षांपूर्वी ती सुरू झाली असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.
पृथ्वीवर ऑक्सिजन कसा निर्माण झाला व सजीवांची उत्क्रांती कशी होत गेली, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी काही प्रयोगही आतापर्यंत करण्यात आले आहेत. महा ऑक्सिडीकरणाची क्रिया अडीच अब्ज वर्षांपूर्वी घडली असावी व दुसरी घटना निओप्रोटिरोझोइक काळात म्हणजे ७५० दशलक्ष वर्षांपूर्वी घडली असावी यावर संशोधकांचे मतैक्य आहे. डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठातील संशोधकांनी रॉबर्ट फ्रे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या संशोधनानुसार ऑक्सिजनचे अस्तित्व ३.८ अब्ज वर्षांपूर्वीही होते. पश्चिम ग्रीनलँडमधील लोहाच्या निर्मितीचा अभ्यास यासाठी वैज्ञानिकांनी केला. ही लोहाची निर्मिती सागरी रसायनांशी संबंधित असून सिलिका, आयर्न हायड्रॉक्साईड्स यांचे एकानंतर एक थर (बँडेड आयर्न फॉर्मेशन्स-बीआयएफ) यात असतात. या थरातून ऑक्सिडीकरणाच्या रचनेची माहिती मिळते. यात समस्थानिकांच्या रचनेचाही अभ्यास करण्यात आला असून एकाच मूलद्रव्याची विविध रूपे म्हणजे समस्थानिके असतात. त्यांचे आण्विक वजन सारखे असते व त्यात क्रोमियम व युरेनियम यांचे अस्तित्व त्यात दिसून आले आहे. क्रोमियम व युरेनियम ही द्रव्ये ऑक्सिजनच्या अभिक्रियाशील रूपांच्या म्हणजे ऑक्सिजनच्या जवळ येतात तेव्हा ती नद्यातून महासागरात येतात व तेथे रासायनिक थर तयार होतात व भूरासायनिक संकेत त्यातून मिळतात. पश्चिम ग्रीनलँडमधील बीआयएफ थरांचे विश्लेषण करण्यात आले असता त्यात या मूलद्रव्यांमुळे ऑक्सिजन फार पूर्वी अस्तित्वात होता असे दिसून आले, तो काळ ३.८ अब्ज वर्षांपूर्वीचा आहे. पृथ्वीच्या आधीच्या अवस्थेत ऑक्सिजन नव्हता असे मानले जाते, पण आताच्या संशोधनानुसार कमी प्रमाणात का होईना पण त्या काळातही ऑक्सिजन होता. सजीवांची उत्क्रांती व जैवविविधतेच्या क्षेत्रातील संशोधनावर या नवीन निष्कर्षांमुळे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.