पॅरीसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची उंची आता आणखी वाढली आहे. १५ मार्च रोजी आयफेल टॉवरवर नवीन डिजिटल रेडिओ अँटेना बसवण्या आल्यानंतर त्याच्या उंचीमध्ये सहा मीटरची भर पडली आहे. तंत्रज्ञ टॉवरच्या शीर्षस्थानी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अँटेना बसवत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. आता आयफल टॉवरची एकूण उंची ३२४ मीटर झाली आहे.
आयफेल टॉवरच्या LaTourEiffel या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “दुर्मिळ आणि नेत्रदीपक तांत्रिक पराक्रम”ने आता टॉवरची उंची ३२४ मीटर वरून ३३० मीटर केली आहे. फ्रेंचमधील ट्विटच्या भाषांतरानुसार, डिजिटल रेडिओ कव्हरेज सुधारण्यासाठी आणि सुमारे ३० DTT चॅनेल आणि २३ रेडिओ स्टेशन्स १२ दशलक्ष इले-डे-फ्रान्स रहिवाशांना प्रसारित करण्यासाठी नवीन सहा मीटर अँटेना स्थापित करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आयफेल टॉवरची निर्मिती १८८७ ते १८८९ या दोन वर्षांमध्ये झाली होती. पॅरीसमधल्या सर्वाधिक उंच टॉवरमध्ये आयफेल टॉवरची गणना केली जाते. अगोदर या टॉवरची उंची ३२४ मीटर होती. जी एखाद्या ८१ मजली इमारतीएवढी आहे. या टॉवरच्या तीन लेव्हल आहेत. या तिन्ही लेव्हल्सला पर्यटक भेट देऊ शकतात. या टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या लेव्हलवर रेस्तराँ आहेत. २७६ मीटरवर म्हणजेच ९०६ फुटांवर या टॉवरची तिसरी लेव्हल आहे. या ठिकाणाहून पर्यटकांना पाहणी करता येते. आयफेल टॉवरला दरवर्षी साधारण ७ लाख पर्यटक भेट देतात.
सुरुवातीला, आयफेल टॉवर फक्त २० वर्षे ठेवण्याची योजना होती. ते १९०९ मध्ये नष्ट करण्यात येणार होते, परंतु या २० वर्षांमध्ये या टॉवरने पर्यटकांना इतके आकर्षित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही ते इतके उपयुक्त मानले गेले की ते पाडण्याऐवजी स्मारक म्हणून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी लाखो लोक आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी येतात.