देशातील तरुण पिढी आणि त्यांच्या बदलत्या आवडीनिवडी यांचा विचार करून ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाने नवी inUth.com ही वेबसाईट सुरू केली आहे. बीटा स्वरुपातील ही वेबसाईट सोमवारपासून ऑनलाईन विश्वात उपलब्ध झाली.
या वेबसाईटच्या माध्यमातून देशातील तरुणांना सोशल मीडिया ट्रेंडिंग बातम्या, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील घडामोडी प्राधान्याने दिल्या जाणार आहेत. या वेबसाईटचे वेगळेपण म्हणजे इथे व्हिडिओंना जास्त प्राधान्य दिले जाणार आहे. वेगवेगळ्या बातम्या आणि विषय व्हिडिओंच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्यात येतील. त्यामध्ये स्टोरी टेलिंग व्हिडिओ, ऑडिओ स्टोरीज, इन्स्टाग्राम व्हिडिओज, स्नॅपचॅट स्टोरीज अशा वेगवेगळ्या विषयातील घडामोडी प्राधान्याने मिळतील. त्याचबरोबर गंभीर स्वरुपाचे लिखाण आणि त्याच्याशी संबंधित व्हिडिओजही वेबसाईटवर वाचकांना पाहायला मिळतील. या वेबसाईटच्या आशय निर्मितीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली असून, त्यामध्ये २४ वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या तरुणांचा समावेश आहे.
या वेबसाईटच्या निमित्ताने इंडियन एक्स्प्रेसचे (डिजिटल) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संदीप अमर म्हणाले, inUth.com आमच्यासाठी एक नव्या स्वरुपाची निर्मिती आहे. देशातील तरुणांच्या बदलत्या आवडीनिवडींबद्दल आम्ही जागरूक आहोत. वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटसवर देशातील तरूण दिवसातील मोठा वेळ घालवत असतो. याच साईटवरून या नव्या वेबसाईटवरील आशय निर्मिती केली जाईल. सध्याच्या टप्प्यात ही वेबसाईट बीटा स्वरुपात असून, येत्या काळात त्यामध्ये आवश्यक बदल केले जातील.
inUth.com चे संपादक कुणाल मुजुमदार म्हणाले, आम्ही एक वेगळाच प्रयोग करत आहोत. त्यामुळे ही वेबसाईट आम्हाला खूप काही शिकवणार आहे आणि तितकाच आनंदही देणार आहे. तरुणांना सध्या काय पाहायला, वाचायला, बघायला आवडते याबद्दल आम्ही खूप संशोधन केल्यानंतरच ही वेबसाईट सगळ्यांसमोर घेऊन आलो आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुणांशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, स्नॅपचॅट या सारख्या सोशल मीडिया साईटवर व्हायरल झालेल्या आशयावर आधारित व्हिडिओ आणि इतर मजकूर तुम्हाला या नव्या वेबसाईटवर पाहता येईल. वेबसाईटवरील जास्तीत जास्त मजकूर हा व्हिडिओच्या स्वरुपातच दिला जाईल. लवकरच परिपूर्ण स्वरुपात ही वेबसाईट सुरू होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.