न्यूझीलंडचा व्लॉगर कार्ल रॉक याला भारत सरकारनं काळ्या यादीत टाकलं आहे. वीजा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. व्लॉगर कार्ल रॉक हा टूरिस्ट वीजावर व्यवसाय करत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याच्यावर प्रतिबंध टाकण्यात आला. तसेच त्याचा विजाही रद्द करण्यात आला. मात्र या कारवाईनंतर व्लॉगर कार्ल रॉक याने काहीच कारण नसताना काळ्या यादीत टाकल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्याची पत्नी मनीषा हीने कोर्टात धाव घेतली आहे. याचिकेत पत्नीने पतीला भारतीय वीजा देण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर भारतात येण्यासाठी न्याय द्यावा, अशी मागणी तिने याचिकेतून केली आहे.

“भारतातून दुबई आणि पाकिस्तानात गेलो होतो. त्यानंतर सरकारनं काहीच कारण न सांगता काळ्या यादीत टाकलं. माझी पत्नी हरयाणाची राहाणारी आहे. सरकारने काळ्या यादीत टाकल्याने मला माझ्या पत्नी आणि कुटुंबापासून वेगळं केलं आहे.”, असं त्याने यावेळी सांगितलं. यूट्यूबर कार्ल रॉक न्यूझीलंडचा नागरिक आहे. त्याने भारतात लग्न केलं आहे. त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ पोस्ट करत पत्नीला २६९ दिवसांपासून बघितलं नसल्याचा दावा केला आहे. यासाठी त्याने एक ऑनलाइन याचिका सुरु केली आहे. त्यात भारत सरकारने कारण न सांगता काळ्या यादीत टाकल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडे नेटीझन्स कार्ल रॉक याला सीएए विरोधातील आंदोलनाची आठवण करून देत आहेत. सीएए विरोधातील त्याची यात्रा आणि पोस्ट त्याला कारणीभूत ठरल्याचं नेटीझन्सचं म्हणणं आहे.

कार्ल रॉकने न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांना एक ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. “मला भारत सरकारने काळ्या यादीत टाकलं आहे. दिल्लीत राहणाऱ्या माझ्या पत्नी आणि कुटुंबापासून वेगळं केलं आहे. काहीही कारण न देता मला काळ्या यादीत टाकलं आहे.” असं ट्वीट त्याने केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.