मध्य प्रदेशातील कारागृहातून फरार झालेले सिमीचे पाच दहशतवादी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या मदतीने महाराष्ट्र, राजस्थान व कर्नाटक या राज्यांत दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत असून या तीनही राज्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
१ ऑक्टोबर २०१३ रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथील कारागृहातून सिमीचे सात कैदी फरार झाले होते. त्यातील मोहम्मद एजाजुद्दीन, मोहम्मद अस्लम, अमजद खान, झाकीर हुसेन आणि मेहबूब गुड्डू हे पाच दहशतवादी अद्यापि फरार आहेत. या पाचही जणांनी आतापर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा व राजस्थान या ठिकाणी प्रवास केला असून १ फेब्रुवारी रोजी बंगलोर-गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये झालेला स्फोट तसेच पुण्यात १० जुलै रोजी झालेला कमी शक्तिशाली स्फोट त्यांनीच घडवून आणला असल्याचा संशय आहे. आता या पाचही जणांनी महाराष्ट्र, राजस्थान व कर्नाटकात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखली असून आयएसआयने त्यांना पाठबळ दिल्याची माहिती गुप्तचर संस्थांच्या हाती आली आहे.