Dangerous Driving साठी रॉबर्ट वढेरांच्या गाडीवर कारवाई; दिल्ली पोलिसांनी ठोठावला दंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी सकाळी घडली. वाढेरा आपल्या ऑफिसला जात असतानाच वाटेत हा अपघात घडला. या प्रकरणात पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलीय

Vehicle Of Robert Vadra Challaned
बुधवारी सकाळी हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य : आयएएनएस आणि रॉयटर्सवरुन साभार)

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या गाडीला बुधवारी अपघात झाला. वढेरा हे आपल्या सुरक्षा रक्षाकांच्या ताफ्यासहीत बारापुला येथून सुखदेव येथील आपल्या कार्यालयात जात असताना हा अपघात घडला. अचानक वढेरा यांच्या गाडीने ब्रेक मारल्याने हा अपघात झाला. अचानक गाडी थांबल्याने वढेरा यांच्या गाडीमागून येणाऱ्या त्यांच्याच सुरक्षा रक्षकांच्या गाडीने वढेरांच्या गाडीला मागून धडक दिली. यानंतर पोलिसांनी वढेरांना बेजबाबदारपणे गाडी चालवण्यासाठी दोषी ठरवत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वढेरा यांची गाडी वेगाने बारापुला पुलावरुन जात होती. अचानक गाडीने ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणाऱ्या गाडीचा चालक गोंधळला आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ही गाडी वढेरा यांच्या गाडीला धडकली. या प्रकरणामध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना बेजबाबदारपणे आणि धोकादायक पद्धतीने गाडी चालवण्याच्या नियमांअंतर्गत १८४ मोटर वाहन कायद्याअंतर्गत म्हणजेच डेंजर्स ड्राइयव्हिंगसाठी दंड करत पावती फाडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी सकाळी घडली. वाढेरा आपल्या ऑफिसला जात असतानाच वाटेत हा अपघात घडला. अपघात झाल्यानंतर वाढेरा हे गाडीची चावी घेऊन कार्यालयात निघून गेले. त्यानंतर तेथील वाहतूककोंडी आणि बेजबाबदार वर्तवणुकीसाठी निजामुद्दीन पोलीस स्थानकामध्ये त्यांच्या गाडीचं चलान कापण्यात आलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The vehicle of robert vadra challaned for dangerous driving scsg