International Day of Yoga 2023 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतासह जगभरात अनेकांनी उत्साहाने योगासने केली. शहरे आणि गावांमध्ये सामूहिक योगासनांचे आयोजन करण्यात आले होते. लडाखमधील उंच भागात, केरळमध्ये पाण्याखाली, आयएनएस विक्रांतवर, वंदे भारत आणि मुंबईच्या लोकल, खुली मैदाने ते बंदिस्त सभागृहांमध्ये सामूहिक योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह विविध मंत्र्यांनीही यामध्ये सहभाग घेतला. अमेरिका, ब्रिटन, नेपाळ, दक्षिण कोरिया इत्यादी देशांमध्येही लोकांनी उत्साहाने योगदिनामध्ये सहभाग घेतला.

योग प्रसार, प्रचारावरून श्रेयवाद; काँग्रेस-भाजपमध्ये जोरदार जुंपली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ‘संयुक्त राष्ट्रां’मध्ये विश्वयोग दिन साजरा करत असताना, योग प्रसार-प्रचाराचे श्रेय लाटण्यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार जुंपली होती. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग लोकप्रिय केल्याचा दावा काँग्रेसने केला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपने, गांधी कुटुंबासाठी मोदींचे योगदान नाकारण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली.

’योगाला लोकप्रिय करण्यात पं. नेहरूंचा मोलाचा वाटा होता, त्यांनीच योगाला राष्ट्रीय धोरणाचा भाग बनवले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आम्ही नेहरूंचे आभार मानतो.. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये प्राचीन कला आणि तत्त्वज्ञानाचे महत्त्व जाणून घेऊया आणि आपल्या जीवनात त्याचा अंतर्भाव करूया, असे ट्वीट काँग्रेसने केले. या ट्वीटसोबत  पं. नेहरूंच्या योगाभ्यासाचे छायाचित्रही ट्वीट केले.

’पण काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी काँग्रेसच्या ट्वीटचे कौतुक करताना योगप्रसार करणाऱ्या प्रत्येक सरकारचे अभिनंदन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. थरूर यांनी ट्वीटमधून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींची तरफदारी केल्यामुळे काँग्रेसच्या श्रेयवादाच्या ट्वीटमधील हवा काढून घेतली गेली. योग हा जगभरातील आपल्या ‘सॉफ्ट पॉवर’चा महत्त्वाचा भाग असल्याचा युक्तिवाद मी अनेक वर्षे केला असून तो ओळखला जात असल्याचे पाहून खूप आनंद झाला, असे ट्वीट थरूर यांनी केले.

’योगाची थट्टा (राहुल गांधींचे ट्वीट) करण्यापासून ते आता गांधी कुटुंबासाठी श्रेय लाटण्याचा काँग्रेसचा प्रयत्न पाहता काँग्रेसने एक वर्तुळ पूर्ण केले आहे. २०१५ पासून जागतिक स्तरावर योगाला ओळख मिळू लागली असून त्याबद्दल काँग्रेसने देशवासीयांचे किमान आभार तरी मानले पाहिजे, असे ताशेरे भाजपचे प्रवक्ता शेहजाद पूनावाला यांनी ओढले.

गुजरातमध्ये योगसाधनेचा जागतिक विक्रम

सुरत : सुरतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या योग दिन सोहळय़ात तब्बल १ लाख ५३ हजार लोकांनी सहभाग घेतल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिली. या जागतिक विक्रमाची नोंद गिनिज बुकमध्ये होईल असे त्यांनी सांगितले. यापूर्वी २०१८ साली राजस्थानातील कोटा शहरामध्ये १ लाख ९८४ लोकांनी सामूहिक योगाचा जागतिक विक्रम केला होता.

राज्य सरकारने या सोहळय़ात १.२५ लाख लोकांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात १.५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्यात सहभाग घेतला अशी माहिती सुरत महापालिका आयुक्त शालिनी अगरवाल यांनी दिली. तर संपूर्ण राज्यात ७२ हजार ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला असून त्यामध्ये १.२५ कोटी लोक सहभागी झाल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितले.