RSS chief Mohan Bhagwat full speech On Learning English: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज शैक्षणिक सुधारणांवर भाष्य केले आहे. त्यांचे भाषण “संघाच्या प्रवासाची १०० वर्षे – नवीन क्षितिज” या तीन दिवसांच्या शताब्दी व्याख्यानमालेचा एक भाग आहे. तत्पूर्वी बुधवारी, भागवत यांनी अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेल्या ५० टक्के टॅरिफवर भाष्य करताना म्हटले होते की, भारताच्या राष्ट्रीय धोरणाने आंतरराष्ट्रीय व्यापार “स्वैच्छिक असून कोणत्याही दबावाखाली नाही” याची खात्री करावी. त्यांनी असेही म्हटले होते की, हिंदू राष्ट्राची आरएसएसची कल्पना कोणाच्याही विरोधात नाही आणि त्यातून कोणालाही वगळण्याचा त्यांचा हेतू नाही.

आज या व्याख्यानमालेत बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “लोकांनी तंत्रज्ञानाचे मालक असले पाहिजेत, तंत्रज्ञान आपले मालक बनू नये. जर तंत्रज्ञान अशिक्षितांच्या हातात गेले तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात. शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नाही. एखाद्याने माणूस बनले पाहिजे. अशा प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे. आपले पूर्वीचे शिक्षण नाहीसे झाले, आपण गुलाम असताना एक नवीन व्यवस्था आली. त्यांनी त्यांच्यानुसार व्यवस्था बनवली. पण आता आपण स्वतंत्र आहोत, आपल्याला केवळ राज्य चालवायचे नाही तर लोकांनीही त्याचे पालन केले पाहिजे. आपल्याला त्या दिशेने जाण्याची गरज आहे. नवीन शिक्षण धोरणात, हे मुद्दे समाविष्ट केले पाहिजेत”, असेही मोहन भागवत म्हणाले. यावेळी भागवत यांनी “राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) हे योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल आहे”, असेही म्हटले.

विविध भाषा शिकण्याबाबत बोलताना भागवत यांनी म्हटले की, “आपली मूल्ये आणि परंपरा विद्यार्थ्यांना शिकवल्या पाहिजेत. आपण ब्रिटिश बनण्याचा प्रयत्न करू नये, परंतु इंग्रजी शिकण्यात काहीच अडचण नाही. इंग्रजी शिकण्यात काय अडचण आहे? ती फक्त एक भाषा आहे. मी आठवीत असताना माझ्या वडिलांनी मला ऑलिव्हर ट्विस्ट वाचायला लावले. ऑलिव्हर ट्विस्ट वाचणे आणि प्रेमचंद यांना विसरणे हे देखील ठीक नाही.”

यावेळी सरसंघचालक भागवत यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना नोकऱ्या देऊ नयेत असे आवाहन केले आणि धर्मांतर व बेकायदेशीर स्थलांतर हे लोकसंख्याशास्त्रीय असंतुलनाचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले. “धर्मांतर आणि बेकायदेशीर स्थलांतर हे लोकसंख्याशास्त्रीय असंतुलनाचे प्रमुख कारण आहेत. आपण बेकायदेशीर स्थलांतरितांना नोकऱ्या देऊ नयेत; आपण आपल्याच लोकांना, ज्यात मुस्लिमांचाही समावेश आहे, त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत”, असे भागवत म्हणाले.

सरकार बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न करत असताना, समाजानेही आपली भूमिका बजावण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.