राज्यांच्या ‘कामगिरी’नुसार लसमात्रांचा पुरवठा केला जात असून आतापर्यंत केंद्राने १६ कोटी लसमात्रा दिल्या आहेत. त्यापैकी १५ कोटी लसमात्रांचा वापर केला असल्याने राज्यांकडे एक कोटी लसमात्रांचा साठा आहे. राज्यांना लसमात्रा पुरवल्या गेल्या नाहीत, असे देशात लसीकरण मोहिमेच्या प्रारंभापासून एक दिवसही झालेले नाही, असा युक्तिवाद करत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लशीच्या टंचाईच्या राज्यांच्या तक्रारी फेटाळून लावल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी राज्यांना देण्यात आलेल्या लसमात्रांचा तक्ता प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार आसाम, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मिझोराम, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना २० लाख ४५ हजार ८९० लसमात्रा केंद्राकडून दिल्या जाणार आहेत. ‘या लसमात्रा दोन-तीन दिवसांत संबंधित राज्यांना पुरवल्या जातील,’ अशी माहिती हर्षवर्धन यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

दिल्लीतही लसीकरण विलंबाने

महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी १ मेपासून १८-४५ वयोगटांतील व्यक्तींच्या लसीकरणाची प्रक्रिया पुरेशा लसमात्रांअभावी लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दिल्ली सरकारनेही लसीकरण मोहीम शनिवारपासून सुरू करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. १८-४५ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांना लसखरेदी करावी लागणार आहे. दिल्लीने मोफत लसीकरणाची घोषणा केली असून उत्पादकांकडून पहिल्या टप्प्यात १.३४ कोटी लसमात्रांची खरेदी केली जाणार आहे. मात्र अजून लसमात्रा उपलब्ध झालेल्या नसल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी गुरुवारी स्षष्ट केले.

‘महाराष्ट्राकडे ७,४९,९६० लसमात्रा’

महाराष्ट्राच्या १२ कोटी ३९ लाख ६१ हजार लोकसंख्येसाठी आतापर्यंत १ कोटी ६३ लाख ६२ हजार ४७० लसमात्रा केंद्राने मोफत पुरवल्या आहेत. त्यापैकी ०.२२ टक्के लसमात्रा वाया गेल्या आहेत आणि एक कोटी ५६ लाख १२ हजार ५१० लसमात्रा लसीकरणासाठी वापरल्या गेल्या आहेत. केंद्राच्या तक्त्यानुसार महाराष्ट्राकडे आणखी ७ लाख ४९ हजार ९६० लसमात्रांचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दोन-तीन दिवसांत होणाऱ्या लसपुरवठ्याच्या यादीतील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही.

प्राणवायूही पुरेसा : केंद्र

दिल्लीत आजही रुग्णालयांना प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. प्राणवायू सिलिंडर फेरभरणी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. ग्रेटर कैलाश भागातील गुरुद्वाराने प्राणवायू लंगर सुरू केला आहे. या गुरुद्वारामध्ये लोकांना प्राणवायू सिलिंडर मोफत फेरभरणी करून दिला जात आहे. मात्र देशात आता पुरेसा प्राणवायूचा साठा असल्याचा दावा हर्षवर्धन यांनी केला. प्राणवायू रुग्णांच्या गरजेनुसार उपलब्ध झाला पाहिजे. त्यामुळे लोकांनी भीतीपोटी प्राणवायू सिलिंडर मिळवण्यासाठी धावाधाव करू नये, असे हर्षवर्धन म्हणाले.

मुंबईतील लसीकरण तीन दिवस बंद

मुंबई : लसटंचाईमुळे मुंबईतील लसीकरण ३० एप्रिल ते २ मे २०२१ या तीन दिवसांत बंद राहील. तसेच १ मे पासून नियोजित १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरणही पुढे ढकलले जाण्याची शक्यता पालिकेने व्यक्त केली. पान ३

‘भारत बायोटेक’ची लस ४०० रुपयांत

नवी दिल्ली : लशीच्या दरावरून चहुबाजूने टीकेची झोड उठविण्यात आल्यानंतर गुरुवारी भारत बायोटेकने राज्यांना ४०० रुपये प्रतिमात्रा या दराने आपल्या ‘कोव्हॅक्सिन’ या लशीचा पुरवठा करण्याचे जाहीर केले. यापूर्वी हा दर प्रतिमात्रा ६०० रुपये इतका होता.

खासगी रुग्णालयांना १ मेपासून लस नाही

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार येत्या १ मेपासून करोना लशींच्या मात्रा खासगी रुग्णालयांना पुरवल्या जाणार नाहीत. ‘शुक्रवारनंतर खासगी रुग्णालयांना मात्रा पुरवल्या जाणार नाहीत. वापरल्या न गेलेल्या मात्रा परत कराव्या लागतील’, असे राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no shortage of vaccines in the country health minister harshvardhan claims abn
First published on: 30-04-2021 at 00:59 IST