पुण्यात झालेल्या एल्गार परिषदप्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी विविध राज्यांतील काही डाव्या विचारवंतांच्या घरावर छापेमारी करीत पाच जणांना अटक केली होती. ही अटकेची कारवाई अनैतिक असल्याचे सांगत याविरोधात गुरुवारी (दि.३०) दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर डाव्या आणि पुरोगामी संघटनांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. डाव्यांच्या नेतृत्वाखील हे आंदोलन होईल, अशी माहिती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी दिली.


येचुरी म्हणाले, डाव्या आणि पुरोगामी संघटनांच्यावतीने गुरुवारी जंतरमंतरवर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. सीपीआयच्या पॉल्युटब्युरोने मंगळवारी देशभरात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या नावाखाली केलेल्या डाव्या विचारवंतांच्या अटकेच्या कारवायांविरोधात निषेध नोंदवला. ही कारवाई म्हणजे लोकशाही हक्कांवर आणि नागरी स्वातंत्र्यावर निर्लज्जपणे केलेली कारवाई असल्याचे डाव्यांनी म्हटले होते. तसेच या सर्वांवरील आरोप मागे घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली होती.

पुणे पोलिसांकडून मंगळवारी विविध राज्यातील प्रसिद्ध डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई केली होती. यांपैकी पाच जणांवर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात यांचा संबंध असल्याचेही पोलिसांचा संशय आहे. या परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारी २०१८ ला भीमा कोरेगाव येथे दंगल उसळली होती.

दरम्यान, प्रसिद्ध तेलूगू कवी वरवरा राव यांना हैदराबाद येथून अटक झाली होती. कार्यकर्ते वर्नन गोसांल्विस आणि अरुण फरेरा यांना मुंबईतून, कामगार संघटनेच्या कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना फरिदाबाद येथून तर नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलाखा यांना नवी दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे.