Supreme Court on Samay Raina: युट्यूबर समय रैनाच्या द इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. आसाम आणि मुंबईमध्ये रणवीर अलाहाबादिया, आयोजक आणि सहभागी परिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण मिळविण्याची मागणी केली होती. आज पुन्हा एकदा रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्याच्या ‘द रणवीर शो’ या पॉडकास्टला पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही परवानगी देत असताना समय रैनाने कॅनडामध्ये केलेल्या एका विधानावर नाराजी व्यक्त करत, ही मुले ओव्हारस्मार्ट आहेत, असे म्हटले.

‘द इंडियाज गॉट लेटेंट’च्या त्या वादग्रस्त भागानंतर समय रैना कॅनडामध्ये शो साठी गेला होता. त्यानंतर भारतात गदारोळ सुरू झाला. या वादाबाबत समय रैनाने कॅनडात विनोद केला होता आणि कायदेशीर कारवाईवर भाष्य केले.

आज झालेल्या सुनावणीदरम्यान समय रैनाचे नाव न घेता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुर्य कांत म्हणाले, “यांच्यापैकी (आरोपी) एकाने कॅनडामध्ये कायदेशीर प्रक्रियेबाबत भाष्य केले. या तरुणांना वाटते की, ते अतिहुशार (ओव्हारस्मार्ट) आहेत. त्यांना कदाचित आम्ही कालबाह्य झालेले वाटत असू. पण त्यांना या न्यायालयाचे अधिकारक्षेत्र कदाचित माहीत नसावे. आम्ही जर ठरवले तर काय करू शकतो. पण आम्हाला हे करायचे नाही. कारण ही तरूण मुले आहेत, आम्ही समजू शकतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समय रैना कॅनडात काय बोलला?

फेब्रुवारी महिन्यात कॉमेडियन समय रैनाने भारतातील वादाबाबत कॅनडात भाष्य केले. “तुम्ही इथे तिकीट काढून आलात, त्यामुळे मला आता भारतातला खटला लढविण्यासाठी काही पैसे मिळतील”, असा विनोद समय रैनाने केला होता. समय रैनाच्या या विनोदाचा उल्लेख त्याचा चाहता असलेल्या शुभम दत्ता याने केला आहे. भारतात एवढा वाद उद्भवला असतानाही समय रैनाने प्रेक्षकांना खळखळून हसविले, असे तो म्हणाला.