ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदू मंदिरांवर सतत हल्ले होत आहेत. मेलबर्नमधील अल्बर्ट पार्क येथे असलेल्या हिंदू मंदिराची तोडफोड करण्याची घटना घडली आहे. मेलबर्नमधील खालिस्तानी समर्थक वारंवार हिंदू मंदिरांना लक्ष्य करत आहेत. याआधी १७ जानेवारी रोजी मेलबर्नमधीलच बीएपीएस स्वामीनारायण मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. मागच्या पंधरा दिवसातला हा तिसरा हल्ला आहे. मेलबर्नमधील अल्बर्ट पार्क येथील हिंदू मंदिराची तोडफोड करतानाच मंदिराच्या भींतीवर खालिस्तानी समर्थकांनी भारताविरोधी मजकूर देखील लिहिला आहे. याठिकाणी असलेले इस्कॉनचे मंदिर हरे कृष्ण मंदिर या नावाने ओळखले जाते. मेलबर्नमधील भक्ती योग आंदोलनाचे हे प्रमुख केंद्र आहे. सोमवारी सकाळी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मंदिराची तोडफोड झाल्याचे लक्षात आले, तसेच मंदिराबाहेरील भिंतीवर “खालिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा लिहिल्याचेही दिसले.

इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते भक्त दास यांनी ऑस्ट्रेलिया टुडेशी बोलताना सांगितले की, आम्ही या घटनेमुळे अतिशय व्यथित झालो आहोत. इस्कॉन मंदिराचे आयटी सल्लागार आणि भाविक असलेल्या शिवेश पांडे यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, शांती प्रिय हिंदू समाजाला दुखविण्याचे काम करणाऱ्या आणि द्वेष पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात व्हिक्टोरिया पोलिस मागच्या १५ दिवसांपासून अपयशी ठरलेली आहे. व्हिक्टोरिया मधील नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी बहुसांस्कृतिक आयोगासोबत एक आपत्कालीन बैठक घेतली होती. त्याच्या काही कालावधीनंतरच हा तिसरा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यातून खालिस्तानी समर्थक हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप हिंदू संस्थांकडून करण्यात येत आहे.

१७ जानेवारी रोजी शिव विष्णू मंदिरावर हल्ला

याआधी खालिस्तानी समर्थकांनी व्हिक्टोरिया येथील शिव विष्णू मंदिरावर हल्ला केला होता. तामिळ हिंदू बांधव तीन दिवसांच्या पोंगल सणानिमित्त मंदिरात दर्शनासाठी पोहोचले असताना मंदिराची तोडफोड झाल्याचे भाविकांच्या लक्षात आले. या मंदिरात अनेकवर्ष पूजाअर्चा करणाऱ्या उषा सेंथिलनाधन यांनी खेद व्यक्त करत सांगितले, ऑस्ट्रेलियामध्ये तामिळ अल्पसंख्यांक आहेत. आमच्या श्रद्धेचे हे ठिकाण असून याठिकाणी झालेले नुकसान मला मान्य नाही. खालिस्तानी समर्थक राजरोसपणे हिंदू मदिराची तोडपझो करुन द्वेष पसरविण्याचे काम करत आहे.

१२ जानेवारी रोजी झाला होता पहिला हल्ला

याआधी १२ जानेवारी रोजी मेलबर्नमधील स्वामीनारायण मंदिरावर भारताविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या घोषणा लिहीत असताना मंदिराला विद्रूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. स्वामिनारायण मंदिराने या हल्ल्याच निषेध केला होता. या विध्वंसक वृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि शांती व सद्भाव टिकून राहावा यासाठी प्रार्थना करत असल्याचे मंदिरातर्फे सांगण्यात आले होते.