कर्नाल : केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात हरयाणातील कर्नाल येथे सहा पोलीस अडथळे तोडून शेतकऱ्यांनी जिल्हा मुख्यालयास घेराव घातला. महापंचायतीसाठी एकूण वीस हजार आंदोलक उपस्थित होते.

निदर्शक शेतकऱ्यांनी महापंचायतीच्या कार्यक्रमानंतर अनाज मंडीकडून मिनी सचिवालय म्हणजे जिल्हा मुख्यालयाकडे कूच केली. तत्पूर्वी अकरा सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. अधिकाऱ्यांशी चर्चा अपयशी ठरल्यानंतर जिल्हा मुख्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्याचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चाने केले.

२८ ऑगस्टला शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली. या लाठीमारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांनी केला.

हरियाणातील कर्नाल येथे शेतकरी महापंचायतीसाठी जमले असून शेतकरी नेत्यांच्या ११ सदस्यीय शिष्टमंडळाला जिल्हा प्रशासनाने बोलणीसाठी पाचारण केले होते. मोठय़ा संख्येने शेतकरी आंदोलक महापंचायतीसाठी जमले होते. महापंचायतीने आधीच जिल्हा मुख्यालयाला घेराव घालण्याचा  इशारा दिला होता.

संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत, बलबीर सिंग राजेवाल, दर्शल पाल, योगेंद्र यादव, गुरुनाम सिंह चादुनी हे महापंचायतीसाठी येथे दाखल झाले. त्यांनी २८ ऑगस्ट रोजी  झालेल्या  लाठीमारप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.  कर्नालचे उपायुक्त निशांतकुमार यादव यांनी शेतकऱ्यांशी चर्चेस तयार असल्याचे सांगितले होते.