Tsunami And Earthquake In Russia No Threat To India: रशियाच्या पूर्व द्वीपकल्प कामचात्काला एक अतिशय शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. यानंतर या परिसरात त्सुनामीचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रशियातील भूकंपाची तीव्रता ८.७ रिश्टर स्केल इतकी होती. यानंतर रशियाच्या कुरिल कोस्टल आयलंड, जपानच्या होक्काइडो आणि अमेरिकेत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने भारतात त्सुनामीच्या धोक्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने म्हटले आहे की, “या भूकंपामुळे भारत आणि हिंदी महासागराला त्सुनामीचा धोका नाही. सुनामी वॉर्निंग सेंटरला ३० जुलै २०२५ रोजी ०४:५४ वाजता कामचात्काच्या पूर्व किनाऱ्यावर ८.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे.”

बुधवारी पहाटे रशियाच्या पूर्वेला असणाऱ्या प्रदेशात ८.७ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. जपानच्या हवामान संस्थेने सांगितले की, सुमारे ३० सेमी उंच त्सुनामीची पहिली लाट होक्काइडोच्या पूर्व किनाऱ्यावरील नेमुरोपर्यंत पोहोचली आहे. कामचात्का द्वीपकल्पातील रशियन भागातही नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

स्थानिक गव्हर्नर व्हॅलेरी लिमारेन्को यांच्या मते, पहिली त्सुनामी लाट पॅसिफिक महासागरातील रशियाच्या कुरिल कोस्टल बेटांवरील मुख्य वस्ती असलेल्या सेवेरो-कुरिल्स्कच्या किनारी भागात पोहोचली. त्यांनी सांगितले की, लोक सुरक्षित आहेत आणि दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत त्यांना उंच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटले आहे की, हवाई, चिली, जपान आणि सोलोमन कोस्टल एरियाच्या काही किनारी भागात सामान्य पातळीपेक्षा १ ते ३ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. रशिया आणि इक्वेडोरच्या काही किनारी भागात ३ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळू शकतात.

भूकंपानंतर ज्या भागांना याचा फटका बसला आहे, त्या भागातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात इमारतींमध्ये जोरदार हादरे बसल्याचे दिसून येत आहे. एका व्हिडिओमध्ये, भूकंपाचा धक्का बसला तेव्हा एका निवासी अपार्टमेंटमधील फर्निचर जोरदार हादरताना दिसत आहे.

अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीने रशिया आणि जपानच्या काही किनाऱ्यांवर पुढील तीन तासांत “धोकादायक त्सुनामी लाटा” येण्याचा इशारा देखील जारी केला आहे. अमेरिकेच्या गुआम बेट प्रदेश आणि मायक्रोनेशियाच्या इतर बेटांवर देखील त्सुनामी वॉच लागू करण्यात आला आहे.