जम्मू : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान जम्मू येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांना प्रत्युत्तर म्हणून ७६ पाकिस्तानी सीमा चौक्या आणि ४२ संरक्षण चौक्यांना (एफडीएल्स) लक्ष्य करत तीन महत्त्वाचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘बीएसएफ’चे जम्मू विभागाचे महानिरीक्षक शशांक आनंद यांनी सांगितले, की ‘गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दहशतवादी तळांवर भारतीय जवानांनी जोरदार हल्ला केला. या अचूक हल्ल्यांमध्ये दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिक ठार झाले. ९ आणि १० मे च्या रात्री एका विशेष शस्त्रप्रणालीचा वापर करून ‘चिकन नेक’ क्षेत्रासमोरील ‘लष्कर-ए-तय्यबा’चे तळ नष्ट करण्यात आले. यामध्ये लोणी, मस्तपूर आणि छाब्रा येथील तीन दहशतवादी तळांचा समावेश होता.’ ‘आम्ही आमच्या सहकारी संस्थांशी समन्वय साधून अजूनही एकूण नुकसानीचे मूल्यांकन करत आहोत. तेथील तीन दहशतवादी तळांबरोबर अनेक चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. सैनिकांनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक पाकिस्तानी गावे रिकामी केली,’ असेही आनंद यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरसुरूच

पाकिस्तानवर विश्वास ठेवणे अशक्य आहे, त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरूच आहे असे सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक शशांक आनंद यांनी स्पष्ट केले. ‘बीएसएफ’ने आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा व्यवस्था कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले. सीमेवर घुसखोरीच्या प्रयत्नांची भीती व्यक्त करत ‘बीएसएफ’ सतर्क असल्याचेही आनंद यांनी सांगितले.

दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी गोळीबार

पाकिस्तानने ४० ते ५० दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना संरक्षण देण्यासाठी ६० भारतीय चौक्या आणि ४९ संरक्षण तळांवर जोरदार गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. यानंतर ‘बीएसएफ’ने त्याला चोख प्रत्युत्तर दिले, अशी माहिती ‘बीएसएफ’चे उपमहानिरीक्षक चितरपाल सिंग यांनी दिली.