टिपू सुलतान जयंती कार्यक्रमाविरोधात मडिकेरीत निदर्शने; पोलिसांचा लाठीमार
कर्नाटकात कोडागू जिल्ह्य़ातील मडिकेरी शहरात म्हैसूरचा अठराव्या शतकातील सत्ताधीश टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्याच्या विरोधात निदर्शने झाली. या वेळी झालेल्या हिंसाचारात विश्व हिंदू परिषदेचा एक कार्यकर्ता ठार झाला.
मंगळवारी सकाळी त्याचा मडिकेरी सरकारी रूग्णालयात मृत्यू झाला. कुटप्पा (वय५०) असे मृतांचे नाव असून टिपू सुलतान समर्थक गट व विरोधी गट यांच्यात बाचाबाचीचे पर्यवसान हिंसाचारात झाले. थिमय्या सर्कल भागात दोन गट एकमेकांना भिडले आणि दगडफेकही झाली. मुस्लीम गटाने मडिकेरी येथे टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढली होती. त्या वेळी दोन गट समोरासमोर एकमेकांना भिडले. निदर्शनादरम्यान पोलिसांपेक्षा संख्या कमी होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
कर्नाटक सरकारने टिपू सुलतानची जयंती १० नोव्हेंबरला साजरा करण्याचे ठरवले होते. यासाठी सरकारने मिरवणुकांना संरक्षण देण्याचे मान्य केले होते. या निर्णयाला हिंदूू गटांचा विरोध होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, टिपू हा ब्रिटिशांविरोधात लढला. त्यामुळे तो स्वातंत्र्ययोद्धा होता. यावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आक्षेप घेत टिपू कट्टर धर्मवादी होता आणि त्याने अनेकांचे सक्तीने धर्मातर केले होते. कर्नाटकातील कुर्ग, मंगलोरचे लोक, तसेच केरळमधील लोक टिपूची जयंती साजरी करण्याने दुखावले गेले होते. टिपूने हिंदू मंदिरेही पाडली होती, असे म्हटले होते. मंगळवारी विधानसौधा येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मंत्र्यांच्या उपस्थितीत टिपूच्या जयंतीचा कार्यक्रम झाला. कर्नाटक, आंध्र, तेलंगण भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय संघचालक व्ही. नागराज यांनी सांगितले की, टिपू जयंती विरोधातील निदर्शनांना आमचे समर्थन आहे.
..तर टिपूला आदर मिळाला असता- कर्नाड
टिपू सुलतान हिंदू असता तर त्याला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना जो आदर प्राप्त आहे; तसा आदर कर्नाटकात प्राप्त झाला असता, असे मत ज्ञानपीठ विजेते लेखक गिरीश कर्नाड यांनी व्यक्त केले. बेंगळुरीतील केम्पेगौडा विमानतळाला टिपूचे नाव देण्याचा निर्णय योग्यच आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ते म्हणाले, आजच्या राज्यकर्त्यांना कुणाचा धर्म व जात काय आहे हे प्रथम पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे टिपूचे चुकीचे मूल्यमापन करण्यात आले. आज दीपावली आहे, तसाच टिपू दिनही आहे.
टिपूवर जातीयवादाचा आरोप खोटा आहे. तो धर्मनिरपेक्ष होता आणि त्याने ब्रिटिशांविरोधात तीन लढाया केल्या होत्या. टिपू व ब्रिटिश यांच्यात म्हैसूरमध्ये युद्धे झाली होती. तो सर्वाचा नेता होता. शृंगेरी मठ, नानजानगुड आणि रंगनाथ स्वामी मंदिरांसाठी त्याने मदत केली होती.
-सिद्धरामय्या, कर्नाटकचे मुख्यमंत्री