सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात निर्माण झालेला नागरिकांचा रोष शमविण्यासाठी भाजपकडून निरनिराळे उपाय योजले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली भाजपकडून बँका व एटीएमच्या रांगेत उभे राहणाऱ्यांना लाडू वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांनी दाखविलेल्या संयमाबद्दल कृतज्ञता म्हणून प्रत्येक कुटुंबाला एक अशाप्रकारे लाडवांचे वाटप करण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. दिल्ली भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज तिवारी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचे उच्चाटन करण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचलले. या निर्णयामुळे काहीशी गैरसोय होऊनदेखील लोक या निर्णयाला पाठिंबा देत आहेत. या लोकांचे कौतूक करणे आणि त्यांनी दाखविलेल्या संयमाचा आदर करणे, हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे येत्या १ जानेवारीपासून ते १० जानेवारीपर्यंत भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लाडू वाटतील. आम्ही कार्यकर्त्यांना तशाप्रकारच्या सूचना दिल्या आहेत. लोक रांगेत उभे राहूनही तक्रार करत नसतील तर आम्ही कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांना एक लाडू देऊ शकत नाही का, असे तिवारी यांनी म्हटले. पंतप्रधानांच्या निर्णयाला पाठिंबा दिल्यामुळे आम्ही त्यांचे किती आभारी आहोत, हे त्यामुळे दिसून येईल. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना एक लाडू द्यावा. शक्य असल्यास पाच घरांमध्ये पाच लाडू वाटावेत. मात्र, हे लाडू भाजपकडून एकत्रितपणे बनवले जाणार किंवा कार्यकर्त्यांना स्थानिक दुकानांमधून घ्यायला सांगितले जाणार, याबाबतचा निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही.दरम्यान, भाजपकडून काही दिवसांपूर्वीच नोटाबंदीच्या निर्णयाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निदर्शनास आलेल्या काही बाबी भाजपला चिंतेत टाकणाऱ्या आहेत. नोटाबंदीचा निर्णय चांगला होता. मात्र, अंमलबजावणीत करताना राहिलेल्या त्रुटींमुळे समाजातील अनेक वर्ग दुखावले गेले आहेत, अशी माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली.
नोटाबंदी निर्णयाला बहुसंख्य देशवासीयांचा पाठिंबाच आहे’, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच सरकार व पक्षातील शीर्षस्थ मंडळी सातत्याने करीत असली तरी नोटाबंदीच्या महिनाभरानंतरही बँका व एटीएमसमोरील रांगा कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशातील नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे. विधानसभा निवडणुका होत असलेल्या या राज्यातील जनमत भाजपला प्रतिकूल होत चालल्याचे अहवाल प्रदेश नेत्यांकडून येत असल्याने राज्यातील चलनपुरवठय़ात वेगाने वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.