Turumala Tirupati Devasthanam News: तिरुपती बालाजी म्हणजे फक्त भारतच नव्हे, तर जगभरातल्या कोट्यवधी भाविकांसाठी श्रद्धेचा विषय. दरवर्षी नित्यनेमाने तिरूमला तिरूपती देवस्थान अर्थात तिरूपती बालाजीच्या दर्शनाला जाणारे भाविक जसे आहेत, तसेच आपल्याला दरवर्षी तिथे जाता येत नाही याची खंत बाळगणारेही लाखो भाविक आहेत. पण भाविकांच्या याच श्रद्धेचा गैरफायदा घेऊन काही मंडळी तिरूमला तिरुपती देवस्थान अर्थात TTD च्या नावाने भाविकांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुद्द देवस्थानकडेही अशा अनेक तक्रारी आल्यानंतर त्यावर अखेर या प्रकरणांची ट्रस्टनं गंभीर दखल घेतली. यासंदर्भात भाविकांना देवस्थाननं आवाहन केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
कशी केली जात आहे फसवणूक?
पोलिसांकडे आणि देवस्थानकडे दाखल झालेल्या तक्रारींवरून या फसवणुकीचे काही प्रकार समोर आले आहे. त्यानुसार, काही मंडळी तिरुपती देवस्थानला येण्याच्या तयारीत असणाऱ्या भाविकांना तिरुपती किंवा तिरुमला या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, मोफत व्हीआयपी दर्शन अशा गोष्टी करुन देण्याचं आश्वासन देतात. विशेष म्हणजे, काही मंडळी आपण तिरुपती देवस्थानचेच कर्मचारी असल्याचेही भासवतात. यासाठी काही विशिष्ट रक्कम शुल्क म्हणून मागितली जाते. एकदा का ही रक्कम भाविकांनी ट्रान्स्फर केली, की समोरच्या बाजूने येणारे सर्व प्रतिसाद थांबतात.
फसवणूक होणाऱ्या भाविकांमध्ये जसे भारतातील भाविक आहेत, तसेच विदेशातील भाविकदेखील आहेत. काही प्रकरणांत तिरूपती देवस्थानच्या नावाने इतरत्र धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करत असल्याची निमंत्रण पत्रेच थेट छापण्यात येतात. या निमंत्रण पत्रकांवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता हा कार्यक्रम मोफत असल्याचं सांगितलं जातं. पण निमंत्रण पत्रकावर दिलेला कोड भाविकांनी स्कॅन करताच तुमच्याकडून विशिष्ट रकमेची मागणी केली जाते. या पैशांमधून काही गोष्टी भाविकांना मिळतील असंही सांगितलं जातं.
TTD च्या नावाने ब्रिटनमध्ये कार्यक्रम!
देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, नुकतंच असंच एक निमंत्रण पत्रक व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालं होतं. यात ‘श्री श्रीदेवी भूदेवी समेता श्रीनिवासा कल्याणामहोत्सवम’ या कार्यक्रमाचं ६ सप्टेंबर रोजी यूकेमध्ये आयोजन करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यावर तिरुपती देवस्थानचा लोगोदेखील लावण्यात आला होता.
कार्यक्रम मोफत असल्याचं सांगितलं खरं. पण क्यूआर कोड स्कॅन कताच तिथे ५६६ डॉलर्स म्हणजे जवळपास ९ हजार रुपयांची मागणी केली जायची. यामध्ये तिरूपती देवस्थानचा लाडू, चांदीचे लॉकेट, हळदी-कुंकू, साडी, मंगळसूत्राचा धागा, ब्लाऊजपीस आणि श्री वेंकटेश्वराची फोटोफ्रेम अशा गोष्टी देण्याचंही नमूद केलं होतं. अशाच प्रकारच्या निमंत्रण पत्रिका आंध्र प्रदेशमध्येही व्हायरल झाल्या होत्या.
तिरूपती देवस्थाननं स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, तिरूपती देवस्थानकडून अशा प्रकारे कोणताही कार्यक्रम घेण्याची परवानगी कुणालाही दिलेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच, याबाबत कोणतेही कार्यालयीन आदेशही दिले नसल्याचं ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे. पण यानंतरदेखील संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांकडून तिरूपती देवस्थानच्या लोगोचा वापर करण्यात आला. अशा लोगोंमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असं देवस्थानकडून सांगण्यात आलं आहे.
भूलथापांना बळी पडू नका
अशा प्रकारच्या फसवणुकींना भाविकांनी बळी पडू नये, असं आवाहन तिरुपती देवस्थानकडून करण्यात आलं आहे. ऑनलाईन जाहिरातींवर भक्तांनी विश्वास ठेवू नये, असंही देवस्थान ट्रस्टनं सांगितलं आहे. तिरुपती देवस्थानचा लोगो परवानगी नसताना वापरून भाविकांची फसवणूक केल्यास अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असं देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.