Tirupati Laddu Row in Supreme Court : तिरुपतीस्थित श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याने मोठा वाद निर्माण झाला. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं असून याविरोधात पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायमूर्ती गवई यांनी वादाचे मूळ असलेल्या लाडूंची न्यायाधीशांच्या जेवणाशी सांगड घालत नर्मविनोदी कमेंट केली व न्यायदानासारख्या रुक्ष क्षेत्रातही विनोदबुद्धीला वाव असल्याचे दाखवून दिले.

भाजचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी, राज्यसभा खासदार सुबा रेड्डी, इतिहासतज्ज्ञ डॉ. विक्रम संपथ आणि दुश्यंत श्रीधर यांनी या लाडू प्रकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजता सुनावणीला सुरुवात झाली. परंतु, सुब्बा रेड्डी यांच्या वकिलांनी ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांच्या वतीने या प्रकरणी सुनावणीसाठी स्थगिती मागितली. त्यामुळे दुपारी १ वाजता या प्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली. तेवढ्यात न्यायमूर्ती गवई यांनी हास्यविनोद केला. “आशा आहे की दुपारच्या जेवणात लाडू नसतील”, असं गवई म्हणाले.

देवांना तरी राजकारणापासून दूर ठेवा

न्यायमूर्ती बी. के. गवई व न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. यावेळी न्यायालयाने “किमान देवांना तरी राजकारणापासून दूर ठेवा अशी अपेक्षा आम्ही करतो”, अशी टिप्पणी केली. “हा श्रद्धेचा विषय आहे. जर भेसळयुक्त तूप वापरलं गेलं असेल, तर ते अजिबात स्वीकारार्ह नाही”, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर केला.

तुषार मेहता यांच्या युक्तिवादावर न्यायमूर्तींनी यासंदर्भातल्या पुराव्याची मागणी केली. “प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी भेसळयुक्त तूप वापरलं गेलं होतं, याचा काय पुरावा आहे?” अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली.

हेही वाचा >> Tirupati Laddu Row: “राजकारणापासून किमान देवांना तरी दूर ठेवा”, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; तिरुपती लाडू प्रकरणावर भाष्य!

‘ते’ तूप वापरलंच नाही!

पुराव्यादाखल प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीच्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने यासंदर्भात सविस्तर टिप्पणी केली आहे. “प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये भेसळ असल्याचा निष्कर्ष ज्या अहवालाच्या आधारे काढण्यात आला आहे, त्या अहवालावरून असं स्पष्ट होत आहे की अहवालासाठीचे नमुने गोळा करण्यात आलेला तुपाचा साठा प्रसाद बनवण्यासाठी वापरलाच गेलेला नाही”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

लाडवांच्या निवडलेल्या नमुन्यांमध्ये प्राण्याची चरबी आढळली असे टीटीडीचे कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंदिरामध्ये तुपातील भेसळ ओळखण्यासाठी चाचणी सुविधा नाही आणि त्यासाठी बाहेरील सुविधेचाही वापर केला जात नाही याचा मंदिराला तुपाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराने फायदा घेतला असा आरोप देवस्थानने केला. भेसळ चाचणी करणे खर्चिक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रकरणी बुधवार २५ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती.