कोलकाता : संसदेच्या आगामी अधिवेशनात काँग्रेसला सहकार्य करण्यात रस नसल्याचे तृणमूल काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तृणमूल काँग्रेस संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात काँग्रेसशी समन्वय साधण्यास इच्छुक नाही, परंतु लोकांच्या हिताशी संबंधित विविध मुद्दय़ांवर पक्ष इतर विरोधी पक्षांना सहकार्य करेल, असे पक्षाच्या एका नेत्याने शनिवारी सांगितले.

२९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते मल्लिाकार्जुन खरगे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत तृणमूल काँग्रेस बहुधा उपस्थित राहणार नाही, असेही त्या नेत्याने सांगितले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान तृणमूलसह सर्व विरोधी पक्षांशी समन्वय साधण्यात येईल, असे म्हटल्याच्या काही दिवसांनंतर तृणमूलने खरगे यांच्या वक्तव्याचे खंडन केले आहे.

काँग्रेसने योग्य अंतर्गत समन्वय साधून आपल्या पक्षाची काळजी घ्यावी. हिवाळी अधिवेशनात काँग्रेससोबत समन्वय साधण्यात आम्हाला रस नाही, असे पक्षाच्या निर्णयाची माहिती असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले. काँग्रेस नेत्यांनी आधी आपापसात समन्वय प्रस्थापित करावा. त्यांनी स्वत:च्या घराची मांडणी करावी आणि मग इतर पक्षांशी समन्वय साधण्याचा विचार करावा, असा सल्ला तृणमूलने दोन्ही पक्षांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला दिला. 

तृणमूल काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी समन्वय साधेल का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘आम्ही लोकांच्या हिताशी संबंधित अनेक मुद्दे उपस्थित करून त्यांच्याशी समन्वय साधू. काँग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला आम्ही उपस्थित राहणार नाही.’

वेगळी बैठक

तृणमूल काँग्रेस २९ नोव्हेंबर रोजी  ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक घेणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पक्ष आपल्या रणनीतीसह विविध मुद्दय़ांवर या वेळी चर्चा करेल, असे तृणमूलच्या नेत्याने सांगितले. जुलैमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूलच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती.