Quality of Life Report 2025: सर्वोत्तम जीवनमान कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा फक्त आर्थिक निकष महत्त्वाचे नसून त्यासाठी आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, सामाजिक व्यवस्था अशा अनेक बाबींचा विचार आवश्यक ठरतो. या सर्व बाबींचा विचार करूनच Numbeo या संस्थेनं जगभरातल्या देशांची सर्वोत्तम ते सर्वात निकृष्ट जीवनमान या आधारावर यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सर्वोत्तम जीवनमान असणारे १० देश आणि सर्वात निकृष्ट जीवनमान असणारे १० देश समाविष्ट करण्यात आले आहेत. या यादीमध्ये भारत आणि शेजारी देश पाकिस्तान यांचादेखील समावेश आहे.

Numbeo ने नुकताच त्यांचा Quality of Life Report 2025 प्रकाशित केला आहे. यामध्ये नागरिकांचं सरासरी आयुषमान, शिक्षण, बालक स्वास्थ्य, प्रदूषण, सुरक्षा, सामाजिक सेवा अशा वेगवेगळ्या निकषांच्या आधारे देशांची वर्गवारी करून त्यांना क्रमवारी दिली आहे. या यादीमध्ये राहण्यासाठी सर्वात योग्य स्थिती असणाऱ्या देशांसोबतच आपल्या नागरिकांना सुरक्षित आणि स्थिर आयुष्य पुरवण्यात अपयशी ठरलेल्या देशांचाही समावेश करण्यात आला आहे.

Quality of Life Report मध्ये पहिल्या स्थानी कोण?

या यादीमध्ये लग्झेम्बर्गला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. लग्झेम्बर्गमधील नागरिकांसाठीची सुरक्षितता, समृद्धी आणि सामाजिक सुविधा यांच्या आधारे या देशाला २१८.२ गुण देण्यात आले आहेत. लग्झेम्बर्गपाठोपाठ नेदरलँड (२१६.५) दुसऱ्या स्थानी, डेन्मार्क (२१५.१) तिसऱ्या स्थानी, तर ओमान (२१५.१) चौथ्या स्थानी आहे. पहिल्या दहा देशांमध्ये ओमान वगळता इतर सर्व देश युरोपमधील आहेत.

वाचा टॉप १० सर्वोत्तम जीवनमान असणारे देश

१. लग्झेम्बर्ग
२. नेदरलँड्स
३. डेन्मार्क
४. ओमान
५. स्वित्झर्लंड
६. फिनलँड
७. नॉर्वे
८. आईसलँड
९. ऑस्ट्रिया
१०. जर्मनी

या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या देशांनी नागरिकांसाठीच्या आरोग्य सेवांमध्ये, शिक्षणामध्ये आणि स्वच्छ पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ, पैसा व ऊर्जेची गुंतवणूक केल्याचं दिसून येत आहे.

सर्वात निकृष्ट जीवनमान असणारे देश…

दरम्यान, सर्वोत्तम जीवनमान असणारे देश यादीत सर्वात वर आहेत, त्याचप्रमाणे सर्वात निकृष्ट सरासरी जीवनमान असणारे देश यादीत सर्वात शेवटच्या १० स्थानांवर आहेत. त्यामध्ये अवघ्या १५.६ गुणांसह नायजेरिया सर्वात शेवटच्या स्थानी आहे. सर्वात निकृष्ट जीवनमान असणाऱ्या देशांमध्ये नायजेरियापाठोपाठ व्हेनेझुएला (७३.७), बांगलादेश (७७), श्रीलंका (८२.८) आणि इजिप्त (८३.२) या यादीत पाकिस्तान १०५.७ गुणांसह ७६व्या स्थानी आहे.

निकृष्ट जीवनमान असणाऱ्या देशांची यादी

१. नायजेरिया
२. व्हेनेझुएला
३. बांगलादेश
४. श्रीलंका
५. इजिप्त
६. इराण
७. पेरू
८. केनिया
९. व्हिएतनाम
१०. फिलिपिन्स

भारत कितव्या स्थानी?

दरम्यान, या यादीमध्ये भारताचा क्रमांक ६२वा आहे. उत्कृष्ट जीवनमानाच्या विविध निकषांच्या आधारे भारताला १२४.४ गुण देण्यात आले आहेत. भारतात गेल्या काही दशकांमध्ये सातत्याने पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान अशा बाबींमध्ये सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे. परकीय गुंतवणूक देखील वाढली आहे. मात्र, प्रदूषणाचं वाढतं प्रमाण, लोकसंख्यावाढीचा ताण, अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची वानवा, शहरी-ग्रामीण जीवनमानातील तफावत अशा समस्या अद्याप कायम आहेत. मात्र, असं जरी असलं तरी इतर शेजारी राष्ट्रांपेक्षा भारताचं मानांकन उत्तम असल्याचं दिसून येत आहे.