RSS backed Gyan Sabha in Kerala गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि पुद्दुचेरी सारख्या राज्यांतील कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणमंत्र्यांसह सुमारे ३०० हून अधिक उच्च शिक्षणतज्ज्ञ केरळच्या कलाडी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित शिक्षा संस्कृती उत्थान न्यासतर्फे आयोजित ज्ञान सभा परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत या ज्ञानसभेला संबोधित करणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत चार दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. मोहन भागवत यांचा हा दौरा अनेक प्रकारे खास असणार आहे. या दौऱ्यात ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर त्यांच्या गाठीभेटी होणार आहेत.
केरळमध्ये ज्ञान सभेचे आयोजन
२५ ते २८ जुलै दरम्यान या ज्ञानसभेचे आयोजन करण्यात आले असून ‘एज्युकेशन फॉर डेव्हलप इंडिया’ या विषयावर ही परिषद केंद्रित असेल. २७ जुलै रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण हे परिषदेचे प्रमुख आकर्षण असेल. या परिषदेत ते शिक्षणातील भारतीयीकरण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची अंमलबजावणी आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
परिषदेचे आयोजन करण्यामागील उद्देश काय?
गायत्री परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन आणि विवेकानंद योग अनुसंधान केंद्र यांसारख्या आघाडीच्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधीदेखील या चार दिवसांच्या या कार्यक्रमात सहभागी होतील. शुक्रवारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी म्हणाले की, भारतातील शिक्षण अधिक भारत केंद्रित आणि ज्ञान केंद्रित कसे होऊ शकते याचा शोध घेणे, हा या परिषदेचा उद्देश आहे. ते म्हणाले, “या परिषदेचा उद्देश पाश्चात्य ज्ञान प्रणालींना विरोध करणे नसून भारतीय विद्यार्थी त्यांच्या परंपरा, संस्कृती आणि ज्ञानात रुजलेले राहतील याची खात्री करणे आहे.”
परिषदेच्या पहिल्या दोन दिवसांत (२५-२६ जुलै) ‘चिंतन बैठक’ होईल. या बैठकीत काही निवडक सहभागी अभ्यासक्रमाचे भारतीयीकरण, भारतीय भाषांचे संवर्धन, नैतिक शिक्षण आणि पारंपारिक ज्ञान प्रणाली या मुद्द्यांवर चर्चा करतील. शेवटच्या दिवशी म्हणजेच २८ जुलै रोजी खुल्या सत्राचे आयोजन केले जातील, ज्यात या विषयांवर धोरणात्मक चर्चा होईल. केरळमध्ये न्यासचा इतका मोठा शैक्षणिक कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे. केरळ हे आदि शंकराचार्यांचे गृहराज्य आहे आणि कलाडी हे त्यांचे जन्मस्थान आहे. या ठिकाणाला आध्यात्मिक वारसा लाभला आहे. त्यामुळे या परिषदेसाठी या ठिकाणाची निवडही महत्त्वपूर्ण आहे.
शिक्षा संस्कृती उत्थान न्यासची स्थापना २००७ मध्ये करण्यात आली. शिक्षा बचाओ आंदोलनाचा विस्तार म्हणून याची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून शिक्षा संस्कृती उत्थान न्यास शैक्षणिक प्रसारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम चालवणे, शाळांसाठी पूरक साहित्य प्रकाशित करणे आणि वर्गखोल्यांमध्ये भारतीय भाषा व नैतिक शिक्षणासाठी अधिक जागा मिळावी यासाठी लॉबिंग करणे यांसारखे कार्य न्यास करते.