जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक जण लष्कर-ए-तोयबा या आंतरऱाष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हैदर आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक विजयकुमार यांच्या हवाल्याने एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

सुमारे आठ तास सुरु असलेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्या जवानांना यश आले होते. मात्र, यामध्ये दोन लष्करी अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद झाले होते. यामध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांतील एका सब इन्स्पेक्टरचाही समावेश होता.

शहीदांमध्ये २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. शर्मा यांचा यापूर्वी अनेक यशस्वी काउंटर टेररिझम मोहिमांमध्ये महत्वाची भुमिका राहिली आहे.

गुप्तचरांच्या माहितीनुसार, कुपडावा जिल्ह्यातील हंदवाडा येथील चांगिमुला येथे काही स्थानिक नागरिकांना बंदी बनवणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवण्यात आली, अशी माहिती लष्करी सुत्रांनी दिली.

हंदवाडा मोहिमेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दहशतवादी घुसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे ५ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जणांची टीमने इथं प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी इथल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले.