‘भारत आणि अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार करार होण्याच्या आपण अगदी समीप आहोत. दोन्ही देशांमध्ये बहुतांश मुद्द्यांवर मतैक्य झाले आहे,’ अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी दिली. दोन्ही देश कराराचा मसुदा तयार करीत असून, प्रस्तावित करारामध्ये द्विपक्षीय व्यापार २०३०पर्यंत ५०० अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती आहे.
अधिकाऱ्याने सांगितले, ‘अमेरिकेबरोबर करार करण्याच्या आपण अगदी समीप आहोत. आता दोन्ही देशांत फार मतभेद राहिलेले नाहीत. दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे आणि असा कुठलाही नवा मुद्दा नाही, की ज्यामुळे अडथळा उत्पन्न होईल. बहुतांश मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत होत आहे.’
भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्यात चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. वाणिज्य आणि उद्याोगमंत्री पीयूष गोयल म्हणाले, ‘भारत आणि अमेरिकेमध्ये प्रस्तावित व्यापार करारावरील चर्चेत प्रगती होत आहे. नजीकच्या काळात दोन्ही देशांमध्ये करार होईल, अशी आशा आहे.’
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक वॉशिंग्टनला गेल्या आठवड्यात रवाना झाले आहे. हे पथक अमेरिकेमध्ये व्यापार करारासाठी बोलणी करीत आहे. तीन दिवसांची ही चर्चा १७ ऑक्टोबर रोजी संपली. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांना द्विपक्षीय व्यापार करारासाठी बोलणी करण्याचे आदेश देण्यात आले. गेल्या महिन्यात गोयल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ अमेरिकेत गेले होते.
