Train Fire Chennai News : तामिळनाडूमधील तिरुवल्लूर या ठिकाणी एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. डिझेल वाहून नेणाऱ्या एका रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना तिरुवल्लूर या ठिकाणी घडली आहे. ही रेल्वे चेन्नईवरून इंधन घेऊन जात होती. या घटनेमुळे त्या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मतदकार्य सुरू आहे.

तामिळनाडूमधील तिरुवल्लूर या ठिकाणी चेन्नई बंदरातून इंधन घेऊन जात असलेल्या मालवाहू रेल्वेला रविवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. या रेल्वेच्या चार डब्ब्यांना आग लागली, त्यानंतर त्या डब्ब्यांना उर्वरित रेल्वेपासून वेगळं करण्यात आलं. त्यानंतर तात्काळ स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

दरम्यान, ही मालवाहू रेल्वे रुळावरून घसरल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. ही घटना घडली तेव्हा त्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अराक्कोनम मार्गावरील रेल्वे सेवा थांबवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे चेन्नईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. ही घटना घडल्यानंतर दक्षिण रेल्वे प्रशासनाने एक्सवर एक पोस्ट करत म्हटलं की, “तिरुवल्लूरजवळ आगीच्या घटनेमुळे सुरक्षिततेच्या उपाय म्हणून ओव्हरहेड वीज बंद करण्यात आली आहे. यामुळे रेल्वेच्या कामकाजात बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी एकदा याबाबतच्या अपडेट्स तपासाव्यात”, असा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिलं आहे.

दरम्यान, ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्या परिसरातील रहिवाशांना तात्पुरतं बाहेर काढण्यात आलं आहे. तसेच आगीच्या घटनास्थळाजवळ असलेल्या घरांमधील घरगुती एलपीजी सिलिंडर देखील घरातून काढून दूर ठेवण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

तिरुवल्लूरचे डीसी एम. प्रताप यांनी सांगितलं की, “आज पहाटे ५:३० वाजता तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ डिझेल मालगाडीलाआग लागली. सुरुवातीला पाच बोग्यांमध्ये आग लागली. रेल्वेकडून माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस आणि इतर सर्व विभाग मदतीला धावले. आम्ही ही आग नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली. तात्काळ रेल्वेचे ४० डब्बे आग लागलेल्या डब्ब्यांपासून वेगळे केले. तसेच जवळपास राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. त्यांना मूलभूत गरजा पुरवल्या जात आहेत. जिल्ह्यांतील अग्निशमन दलाचे पथक देखील एकत्र केले जात आहे. आग जवळजवळ आटोक्यात आली आहे.”