रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात १५ तास उशिराने धावणाऱ्या रेल्वेंचे प्रमाण तीन पट वाढल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यापैकी बहुतांश रेल्वे या बिहारला जाणाऱ्या आहेत. हे वृत्त माध्यमांमध्ये आल्यानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. रेल्वे वेळा पत्रकाप्रमाणे रेल्वे चालवण्यात याव्यात अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. जर रेल्वे वेळापत्रकाप्रमाणे धावल्या नाहीत तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले.

ट्रेन सुविधा डॉट कॉम या संकेतस्थळाने रेल्वेच्या उशिरा धावण्यावर एक अहवाल तयार केला आहे. २०१४-१५ या वर्षामध्ये १५ तास उशिरा धावणाऱ्या रेल्वेची संख्या ४७९ होती. तर २०१६-१७ या वर्षामध्ये उशिरा धावणाऱ्या रेल्वेंच्या संख्येत वाढ होऊन ती १३३७ झाली आहे. या रेल्वेंमध्ये पॅसेंजर, एक्सप्रेस या रेल्वेंचा समावेश आहे त्याबरोबरच राजधानी आणि शताब्दी यासारख्या सुपरफास्ट एक्सप्रेस देखील आहेत.

या वेबसाइटनुसार राजधानी एक्सप्रेस २०१७ या वर्षात एकूण ५३ वेळा १५ तासांपेक्षा उशिरा धावली आहे. शताब्दी १९ वेळा, गरीब रथ ४६ वेळा उशिरा धावली आहे. एक्सप्रेस रेल्वे १५ तासांपेक्षा उशिरा धावण्याची वेळ ही ४५१ पेक्षा जास्त अधिक वेळा आली आहे. तसेच १० तासांपेक्षा अधिक उशीर करणाऱ्या रेल्वेंची संख्या देखील वाढली आहे. सर्वाधिक उशिरा धावणाऱ्या रेल्वेची यादी या संकेतास्थळाने प्रसिद्ध केली आहे. पहिल्या १० पैकी सात रेल्वे या बिहारमधून प्रवास करणाऱ्या आहेत.

स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस, आभा तुफान एक्सप्रेस, बरोनी-ग्वालियर मेल, यूपी संपर्क क्रांती एक्सप्रेस, ब्रह्मपुत्र मेल, गरीब रथ भागलपूर, अमृतसर हावडा एक्सप्रेस या रेल्वे सर्वाधिक उशीर लावतात. या उशिरा धावणाऱ्या गाड्यांचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यावर सुरेश प्रभूंनी रेल्वे वेळेवर धावतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. आपल्या विभागाच्या रेल्वेंवर प्रशासनाने नजर ठेवावी असे ते म्हणाले. रेल्वे वेळेप्रमाणे धावतील याकडे लक्ष पुरवावे तसेच जे अडथळे या कामात येत असतील ते दूर करावेत असे प्रभूंनी म्हटले आहे.