Greater Noida News : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती संबंधित सोसायटीच्या परिसरात पसरताच मोठी घबराट पसरली होती. दरम्यान, त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे.

नेमकं काय घडलं?

नोएडामधील एका सोसायटीत राहणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने सोमवारी इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारली आणि जीवन संपवलं. या प्रशिक्षणार्थी डॉक्टरचं नाव शिवा असं असून वय २९ वर्ष असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान,अतिरिक्त डीसीपी (सेंट्रल नोएडा) शाव्या गोयल यांच्या म्हणण्यानुसार, “या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने बाल्कनीत जाऊन इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.”

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि पुढील चौकशी सुरू असल्याचं अतिरिक्त डीसीपींनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. दरम्यान, हा प्रशिक्षणार्थी डॉक्टर मथुरा येथील होता. तो दिल्लीतील एका खासगी महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेत होता.

तसेच कोविड-१९ साथी दरम्यान २०२० मध्ये मानसिक आरोग्य समस्या निर्माण झाल्यानंतर त्याला त्याचं वैद्यकीय प्रशिक्षण थांबवावं लागलं होतं. या समस्यांमुळे त्याला मोठ्या प्रमाणात नैराश्य आलं होतं. तसेच घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. घटना घडली तेव्हा त्याचं कुटुंबीय देखील त्या ठिकाणी उपस्थित होतं. या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने जीवन का संपवलं? याचा तपास पोलीस करत आहेत.