लान्स नाइक हणमंतप्पा कोप्पड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्य़ातील बेटादूर या गावी लष्करी इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. सियाचेनमधील हिमवादळानंतर ३० फूट बर्फाखाली अडकूनही ते सहा दिवस जिवंत राहिले होते. तेथून त्यांना नवी दिल्लीतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. तेथे गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली होती.
हणमंतप्पा यांचे पार्थिव गुरुवारी रात्री दिल्लीहून हुबळी येथे आणण्यात आले होते. तेथील केआयएमएस रुग्णालयात त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. नंतर तो नेहरू मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तेथे हजारो आबालवृद्धांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी ‘हणमंतप्पा अमर रहे’च्या आणि देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारून गेले होते. गावातील हायस्कूल मैदानावर त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. शुक्रवारी ग्राम पंचायतीजवळच्या मैदानात लिंगायत पद्धतीनुसार त्यांचा दफनविधी पार पडला. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना आणि ग्रामवासीयांना शोक अनावर झाला. त्यांच्या पत्नी महादेवी, आई आणि दोन वर्षांच्या मुलीचे सांत्वन करताना गावकऱ्यांनाही हुंदका आवरत नव्हता. याच वेळी महादेवी यांना थोडी चक्करदेखील आली. त्यांना उपस्थितांनी लगेच सावरले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केंद्रीय मंत्री अनंत कुमार, राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी कोप्पड यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची सानुग्रह मदत, पत्नीला नोकरी आणि जमीन देण्याची घोषणा केली होती. तसेच हणमंतप्पा यांचे स्मारक उभारण्याचेही घोषित केले होते. सियाचेन येथे मरण पावलेल्या म्हैसुरू येथील महेश आणि हसन येथील नागेश यांनाही राज्य सरकारने अशीच मदत जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribute to hanumanthappa koppada
First published on: 13-02-2016 at 03:18 IST