नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयासमोर धरणे धरणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या १० खासदारांनी थेट पोलीस ठाण्यात २४ तासांचे ठिय्या आंदोलन पूर्ण केले. त्यानिमित्ताने मंगळवारी दिवसभर राजकीय नाटय़ पाहायला मिळाले.

आंदोलक खासदारांना सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच सोडून दिले होते पण, ते पोलीस ठाण्यातून जायलाच तयार नाहीत, असा दावा मंदिर मार्ग पोलिसांनी केला. पोलिसांनी आम्हाला संध्याकाळी सहा नव्हे तर मध्यरात्री साडेबारानंतर सोडून दिले. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात थांबलो,  २४ तास आंदोलन करणार असल्याचे आम्ही आधी जाहीर केले होते, त्यानुसार आम्ही पोलीस ठाण्यात आंदोलन केले असे डोला सेन यांनी सांगितले.

पोलिसांनी खासदारांना बेकायदा ताब्यात घेतले आणि आंदोलन करण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले असा आरोप तृणमूल काँग्रेसने केले असून त्यासंदर्भात पश्चिम बंगालच्या राज्यपालांना पत्र लिहिले आहे.

हेही वाचा >>>महिला वकिलासोबत ३६ तासांचा Video कॉल, नार्कोटिक्स चाचणीची बतावणी आणि नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणीची मागणी!

ताब्यात घेण्यात आलेले दहापैकी दोन खासदार मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यातून बाहेर गेले व काही वेळाने ते परत आले पण, त्यांना पोलिसांनी ठाण्यात येऊ दिले नाही. उलट, इतर खासदारांनाही ठाण्यातून जाण्यास सांगितले गेले. मात्र, त्यांनी २४ तासांच्या आंदोलनाचा भाग म्हणून पोलीस ठाण्यात धरणे धरले.

आंदोलक खासदारांना पािठबा देण्यासाठी आलेले ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनाही पोलिसांनी प्रवेश दिला नाही. घरी जाऊन परत आलेल्या दोन खासदारांना पोलीस ठाण्यात प्रवेश न दिल्याचा इतर आठ तृणमूलच्या खासदारांनी निषेध केला. पोलीस ठाण्याचे दरवाजे बंद ठेवण्यात आले असून सामान्यांनी कुठे जायचे? पोलीस ठाण्याची दारे बंद झालेली कुठे पाहिली आहेत का, असा सवाल करत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील दिल्ली पोलीस पक्षपाती असल्याचा आरोप त्यांनी केला.

आंदोलनाचे कारण

पश्चिम बंगालमध्ये ईडी, सीबीआय, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणा मनमानी करत असून या यंत्रणांचे प्रमुख बदलण्याची मागणी करत तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची सोमवारी भेट घेतली होती. त्यानंतर आयोगाच्या मुख्यालयाच्या दारात त्यांनी २४ तासांचे ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

आम्ही १० खासदार आणि तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदारांनी सोमवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाबाहेर २४ तास शांततापूर्ण धरणे सुरू केले होते. दिल्ली पोलिसांनी आमची धरपकड केली, आम्हाला ताब्यात घेतले, दिल्लीभर फिरवले आणि शेवटी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ठेवले.. आमचा निषेध २४ तासांचा आहे. आम्ही सर्व मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आहोत, तिथे चूपचाप आमचे आंदोलन सुरू ठेवले आहे. – साकेत गोखले, राज्यसभा खासदार, तृणमूल काँग्रेस</strong>