लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे के. सुरेश हेसुद्धा या पदाच्या शर्यतीत होते. परंतु, आवाजी मतदानात ओम बिर्ला यांची निवड झाली. दरम्यान, या निवडणुकीवर तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सभागृहाबाहेर येऊन तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधून भाजपावर टीका केली आहे.

अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “नियमानुसार सभागृहाच्या कोणत्याही सदस्याने मत विभाजनाची मागणी केल्यास, हंगामी अध्यक्षांनी परवानगी दिली पाहिजे. संसदेतील लाईव्ह टीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की विरोधी पक्षातील सदस्यांनी मतविभाजनाची मागणी केली होती. मतदानासाठी प्रस्ताव ठेवण्याची मागणी केली होती. परंतु, मतदानासाठी प्रस्ताव न ठेवता आवाजी मतदान घेण्यात आले. सत्ताधारी पक्षाकडे, भाजपाकडे संख्याबळ नाही याचा हा स्पष्ट पुरावा आहे. हे सरकार आकड्यांशिवाय चालत आहे. हे बेकायदा, अनैतिक आणि असंवैधानिक सरकार आहे.”

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला प्रस्ताव आवाजी मतदानाद्वारे मंजूर करण्यात आला. काँग्रेसनेही के. सुरेश यांना या शर्यतीत ठेवलं होतं. परंतु, मतविभाजन झाले नसल्याने विरोधकांनी यावर प्रचंड टीका केली आहे. परंतु, मत विभाजनासाठी विरोधकांनी दबाव आणला नाही, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. त्यावर अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, ५०० पैकी एकाने जरी मतविभाजनाची मागणी केली तरी मतविभाजन करावं लागतं. हाच नियम आहे. त्यामुळे मतविभाजनास का नकार देण्यात आला याचा खुलास हंगामी अध्यक्षांनी केलाच पाहिजे.

हेही वाचा >> लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिघाडी? तृणमूलच्या खासदाराचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसचा एकतर्फी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृणमूलचा होता काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध

लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारी संदर्भात बोलताना तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून के सुरेश यांना नामनिर्देशित करण्यात आले. मात्र, के सुरेश यांना नामनिर्देशित करण्यापूर्वी काँग्रेसने तृणमूल काँग्रेस पक्षाची सल्लामसलत करायला हवी होती. मात्र, कोणतीही चर्चा केली नाही. याबाबत आमच्याशी संपर्क साधला गेला नाही. कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे दुर्दैवाने हा एकतर्फी निर्णय आहे”, असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.