तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा त्वरित देण्यात यावा, या मागणीसाठी तेलंगणा राष्ट्र समितीच्या वतीने शुक्रवारी ‘चलो विधानसभा’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी विधानसभा परिसर तसेच सचिवालय परिसरात कडेकोट बंदोबस्त करून त्या दिशेने जाणारी वाहतूकही बंद केली. दरम्यान, अनेक ठिकाणी तेलंगणा आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी या प्रकरणी आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि टीआरएसच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
टीआरएसने जाहीर केलेल्या ‘चलो विधानसभा’ आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी हैदराबाद शहरासह आजूबाजूच्या भागातही कडेकोट बंदोबस्त ठेवला असून शहराच्या अनेक भागांत संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीतच विधानसभेचे कामकाज सुरू करण्यात आले होते.
तेलंगणाच्या मुद्दय़ावर उस्मानिया विद्यापीठातील वातावरणही तणावपूर्ण आहे. काही विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी काही आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या दगडफेकीत पोलिसांसह काही विद्यार्थीही किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त (पूर्व विभाग) आर जया लक्ष्मी यांनी दिली.
विधानसभेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तेलंगणा कृती समितीचे नेते कोदानदरम यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी इंदिरा पार्क परिसरात ताब्यात घेतले. याशिवाय टीआरएसचे नेते चंद्रशेखर राव यांचा मुलगा आ.तारकर्मा राव आणि त्यांची मुलगी तेलंगणा जागृतीच्या नेत्या के. कविता यांनाही शहरातील विविध भागांतून पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, तेलंगणाच्या मुद्दय़ावर टीआरएस, टीडीपी (तेलंगणा मंच), भारतीय मार्क्‍सवादी पक्ष आणि भाजप आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे काहीही काम न होता सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. सभागृहाचे कामकाज थांबवल्यानंतर विधानसभेच्या प्रवेशद्वारांजवळ ठाण मांडून बसलेल्या टीआरएस, टीडीपी (तेलंगणा मंच), भारतीय मार्क्‍सवादी पक्ष आणि भाजपच्या सुमारे २० आमदारांना ताब्यात घेण्यात आले.
रेल्वेसेवा व वाहतुकीवर परिणाम
टीआरएसच्या वतीने आयोजित केलेल्या ‘चलो विधानसभा’ आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे शहरातील रेल्वेसेवा तसेच वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. कोणत्याही रेल्वे गाडय़ा रद्द केलेल्या नाहीत. मात्र विजयवाडा आणि सिकंदराबाद दरम्यानच्या अनेक गाडय़ा विलंबाने धावत होत्या. तर वातानुकूलित बससेवा वगळता इतर सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत चालू होत्या. तसेच संध्याकाळनंतर वातानुकूलित बससेवाही सुरू करण्यात आल्याची माहिती विजयवाडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू बस स्थानकाचे साहाय्यक वाहतूक व्यवस्थापकांनी दिली.
टीआरएसचे बंदचे आवाहन
स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्दय़ावर आंध्र प्रदेश सरकार योग्य ती कार्यवाही करीत नसल्याचा आरोप करीत तसेच ‘चलो विधानसभा’ आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ तेलंगणा राष्ट्र समितीच्या वतीने शनिवारी तेलंगणा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीआरएस आमदारांचा विधानसभा इमारतीवर चढण्याचा प्रयत्न
तेलंगणाला तातडीने स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला नाही तर आंध्र प्रदेश विधानसभेच्या इमारतीवरून उडी मारण्याची धमकी तेलंगणा राष्ट्र समितीच्या दोन आमदारांनी दिल्यामुळे परिस्थिती तणावाची बनली. तर अन्य आमदारांनी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करून सरकारचा निषेध केला. के. समय्या आणि डी. विनय भास्कर या दोन आमदारांनी हातात काळे झेंडे घेऊन विधानसभेच्या इमारतीवर चढून ‘चलो विधानसभा’ आंदोलनात पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना तातडीने सोडावे, अशी मागणी केली. तब्बल तासभर चाललेल्या या नाटय़ानंतर विधानसभेतील कर्मचाऱ्यांनी दोन्ही आमदारांना खाली उतरवले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trs calls for telangana shutdown over chalo assembly arrests
First published on: 15-06-2013 at 04:28 IST