अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवरून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधीनंतर अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुकीत सैन्य बोलवण्याचा मोठा मुद्दा होता. अफगाणिस्तानमधून अमेरिकेनं सैन्य मागे घेतल्यानंतर तालिबाननं हैदोस घातला आहे. अफगाणिस्तानमधील ८० टक्के भाग आता तालिबानच्या ताब्यात आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावरून जो बायडेन यांच्यावर टीका केली जात आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते, तर स्थिती वेगळी असती असं नेटकरी सांगत आहेत. दरम्यान ट्रम्प यांच्या वतीने त्यांच्या प्रवक्त्याने एक वक्तव्य जारी केलं आहे. “तु्म्हाला अजूनही माझी आठवण येते का?”, असं त्यांनी सांगितलं आहे.

ट्रम्प यांच्या अधिकृत प्रवक्त्या लिज हॅरिंगटन यांनी ट्वीट केलं आहे. “अफगाणिस्तानमधील स्थिती खूपच वाईट आहे. पूर्णपणे खुल्या आणि तुटलेल्या सीमा, विक्रमी गुन्हे, तेलाच्या वाढच्या किंमती, वाढती महागाई आणि सर्व जगाने याचा फायदा उचलला आहे. तुम्हाला माझी अजूनही आठवण येते का?’, असं ट्वीट लिज हॅरिगटन यांनी केलं आहे.

जानेवारीत युएस कॅपिटल इमारतीवर हल्ला झाल्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं खातं अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केलं आहे. फेसबुकनेही अशीच बंधनं लादली आहेत. त्यामुळे ट्रम्प आपली मतं सोशल मीडियावर स्वत: जारी करू शकत नाही. त्यामुळे ते त्यांची मतं प्रवक्तांच्या माध्यमातून जारी करत आहेत.

“…तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावं लागेल”; सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

अफगाणिस्तानमध्ये तालिबान दहशतवादी एक एक करत शहरांवर ताबा मिळवत आहे. आता तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्ताच्या काबुलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच देशातील सर्वच सीमा ताब्यात घेतल्या आहेत. याबाबतची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी काबुलच्या कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तसेच लोकांमध्ये दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे.