अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील वस्तूंवर २५ टक्के शुल्कासह डझनभर देशांवर व्यापक नवीन कर लागू केले. १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी व्यापार करारांसाठीच्या वाटाघाटी संपल्या आणि पाच डझनहून अधिक देशांसाठी कर वाढवणाऱ्या कार्यकारी आदेशावर अमेरिकी अध्यक्षांनी गुरुवारी स्वाक्षरी केली. ‘फरदर मॉडिफाइंग द रिसिप्रोकल टेरिफ रेट्स’ या शीर्षकाच्या कार्यकारी आदेशात ट्रम्प यांनी जवळजवळ ७० राष्ट्रांसाठी कर दर जाहीर केले आहेत.
जारी झालेल्या यादीनुसार भारतावर २५ टक्के कर लादण्यात आला आहे. तथापि, कार्यकारी आदेशात ट्रम्प यांनी सांगितलेल्या ‘दंड’चा उल्लेख नाही. रशियाकडून लष्करी उपकरणे आणि ऊर्जा खरेदी केल्यामुळे हा दंड भारताला भरावा लागणार असल्याचे ट्रम्प यांनी बुधवारच्या घोषणेत म्हटले होते.
‘ट्रम्प यांना नोबेल मिळाला पाहिजे’
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षासह जगभरातील अनेक संघर्ष संपुष्टात आणले. त्यामुळे त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला पाहिजे, असे व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी सांगितले. गुरुवारी पत्रकार परिषदेत लेविट म्हणाल्या, ट्रम्प त्यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात दरमहा सरासरी एक शांतता करार किंवा युद्धबंदी केली आहे.