काही दिवसांपूर्वी भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह आणखी काही चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अन्य काही देशांमधूनही तसाच सूर उमटू लागला होता. अमेरिकेनंही सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला ४५ दिवसांचा अल्टीमेटमही दिला होता. परंतु आता ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांमध्ये अमेरिकेतील आपली संपत्ती विकण्याचा आदेश दिला आहे. ज्याद्वारे कंपनी अमेरिकेत परिचालन करते ती  संपत्ती विकण्याचे आदेश ट्रम्प यांनी बाईटडान्सला दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काही विश्वसनीय माहिती मिळाली असून चिनी कंपनी बाईटडान्स असं काही काम करू शकते ज्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे,” असं ट्रम्प यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. तसंच अर्थव्यवस्था. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला हे अॅप धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वी-चॅट या कंपन्यांसोबत करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरदेखील निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या हा व्यवसाय खरेदी न करण्याच्या शक्यतेकडे पाहता त्यांनी देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत दिली होती. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीदेखील केली होती. यापूर्वी सीनेटनं अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात आहे,” असं ट्रम्प आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trump orders bytedance to divest interest in us tiktok operations within 90 days security reason jud
First published on: 15-08-2020 at 12:47 IST