चीनविरोधात अमेरिकेचं पाऊल, डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर केली स्वाक्षरी

हाँगकाँगलाही चीनप्रमाणेच वागवलं जाईल; ट्रम्प यांचं वक्तव्य

अमेरिका आणि चीनमधील मतभेद आता तीव्र होताना दिसत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात मोठी कारवाई करत त्यांच्यावर कठोर निर्बंध घालण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. यासह हाँगकाँगला व्यापारासाठी देण्यात आलेला विशेष दर्जाही काढून घेण्यात आला आहे. ट्रम्प यांनी हाँगकाँगमधील दडपशाहीच्या कारवायांविरोधात आणि अत्याचारासाठी चीनवर आरोप केले होते. तसंच नव्या कायद्यामुळे चीनला त्याच्या कारवायांसाठी जबाबदार धरण्यास अनेक अधिकार देण्यात येतील, असंही ते म्हणाले होते.

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधला. “हाँगकाँगच्या लोकांविरुद्ध चीनने केलेल्या अत्याचाराविरोधात त्यांना जबाबदार धरण्यासाठी मी आज कायदा आणि आदेशावर स्वाक्षरी केली. हाँगकाँगमध्ये जे काही घडत आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. अशा परिस्थितीत त्यांची स्वायत्तता संपवणं योग्य नाही. आम्ही चिनी तंत्रज्ञान आणि दूरसंचार प्रदात्यांचा सामना केला. सुरक्षेच्या कारणास्तव, अनेक देशांना आम्हाला हे पटवून द्यावे लागले की हुआवे धोकादायक आहे. आता युनायटेड किंगडमनंही त्यांच्यावर बंदी घातली आहे,” असं ते म्हणाले.

“हाँगकाँगमध्ये काय घडले हे आम्ही पाहिलं. मुक्त बाजारात स्पर्धा होऊ नये म्हणून त्याचे स्वातंत्र्य काढून घेण्यात आले. मला असं वाटतं की बरेच लोक आता हाँगकाँग सोडत आहेत. आम्ही खूप चांगला स्पर्धक गमावला आहे. आम्ही त्यांच्यासाठी बरंच काही केलं,” असंही ते म्हणाले. आता हाँगकाँगला कोणताही विशेष दर्जा दिला जाणार नाही. हाँगकाँगलाही चीनप्रमाणेच वागवलं जाईल. अमेरिकेचा फायदा चीनने घेतला. परंतु त्याच्या मोबदल्यात विषाणू दिला. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सोवावं लागल्याचंही ट्रम्प म्हणाले.

चीनविरोधात पाऊल उचललं

“विकसनशील देशाच्या नावावर चीन कायम अमेरिकेकडून फायदा उचलत राहिला आणि मागील सर्व सरकारकडून त्यांना मदत मिळाली. आम्ही चीनविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. त्यांच्यामुळे आज जग एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे,” असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. तसंच यावेळी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवरही निशाणा साधत ते चीनच्या हातचे बाहुले असल्याचा पुनरूच्चार केला. तसंच करोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी चीनच जबाबदार असल्याचं सांगण्यात आपल्याला काहीही चुकीचं वाटत नसल्याचंही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Trump signed legislation and an executive order to hold china accountable people of hong kong america jud

ताज्या बातम्या